Pune News : निवडणुकीपेक्षा निविदांमध्ये अधिक रस ; महापालिकेच्या ‘नव्या’ रणनीतीची जोरदार चर्चा

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने कंबर कसली अलून त्यासाठी २३ कक्ष स्थापन केले आहेत. या कक्षांद्वारे निवडणुकीसाठीची आवश्यक कामे निविदा काढून केली जातात. आता निविदा निवडणूक विभागच काढणार असून त्यासाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक केली आहे.विशेष म्हणजे पालिकेत यापूर्वी कधीही निवडणूक विभाग निविदा काढत नव्हते. मात्र, पहिल्यांदाच या विभागाला निवडणुकीपेक्षा निविदांमध्ये रस आल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.
निवडणुकीसाठी काढलेल्या निविदांचे, तसेच खर्चाचे कोणतेही ऑडिट होत नाही. पालिकेने २०१७ च्या निवडणुकीसाठी २० ते २५ कोटींचा खर्च केला होता.निवडणुकीसाठी पालिकेस स्टेशनरी, विद्युत साहित्य, मतदान केंद्रावरील तातडीची कामे, वाहन, जेवण, मांडव व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यासाठी पालिकेने वेगवेगळया विभागांतील अधिकाऱ्यांवर जबाबदारी देत त्यांचे स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत.
कामे करण्यासाठी निविदा काढण्याची तसेच खर्चाची जबाबदारी संबधित कक्ष प्रमुखांवर असते. मात्र, निवडणुकीसाठी या प्रक्रीयेत बदल करत संपूर्ण निविदा प्रक्रिया निवडणूक कार्यालयामार्फत राबविण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यासाठी काही उप-अभियंते तसेच कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.





