Pune News: पुण्यात नामांकित कंपन्यांची मोठी वीजचोरी! महावितरणच्या धाडीत धक्कादायक प्रकार उघड
Pune News: पुणे परिमंडलात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघड; महावितरणकडून २५ लाख युनिट्स चोरीप्रकरणी ६ कोटी १५ लाखांचा दंड.

Pune News – मीटरमध्ये फेरफार आणि थेट आकडे टाकून होणाऱ्या वीजचोरीविरोधात महावितरणने पुण्यात धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत पुणे परिमंडलात तब्बल १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, यामध्ये २५ लाख ८९ हजार ९५० युनिटची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत महावितरणने संबंधितांना तब्बल ६ कोटी १५ लाख रुपयांचा जबर दंड ठोठावल्याने बेकायदेशीरपणे वीज वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्ता पेठ शहर मंडलात ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीज’ने ७४,९२२ युनिटची चोरी केल्याबद्दल १६ लाख १६ हजार रुपये, तर ‘संत कृपा एंटरप्रायझेस’ला ३८,६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, हडपसर औद्योगिक क्षेत्रातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’वर ४७,८६७ युनिट वीजचोरीप्रकरणी १६ लाख २९ हजारांची, तर गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला ४७,
२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजारांची दंडात्मक कारवाई झाली आहे. याशिवाय मंचर, राजगुरुनगर, हडपसर आणि औंध उपविभागातही अनेक वैयक्तिक व व्यावसायिक ग्राहकांवर लाखो रुपयांच्या दंडाची टांगती तलवार आली आहे. वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे.
वीजचोरीमुळे केवळ महसुलाचे नुकसान होत नाही, तर थेट जोडणीमुळे प्राणघातक अपघातांचा धोकाही वाढतो. वीज कायद्यात दंडासोबतच कारावासाची कठोर तरतूद असल्याने नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर न करता अधिकृत वीजजोडणी घेऊनच सुरक्षित वापर करावा, असे स्पष्ट आवाहन महावितरणने केले आहे.





