Pune District : रिसॉर्टवर वीजचोरी प्रकरणी ८ लाखांचा दंड
Pune District : महावितरणच्या राजगुरुनगर विभागाचे उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे, कनिष्ठ अभियंता अजय पोफळे व त्यांच्या पथकाने २ जुलै रोजी रिसॉर्टवर तपासणी केली.

राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वांद्रा गावातील पढरवाडी येथे असलेल्या पॅराडाईज रिसॉर्ट लेक येथे वीजचोरी झाल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाईट शाखेचे कनिष्ठ अभियंता अजय पोफळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईनंतर पश्चिम भागातील फार्महाऊस, बंगले आणि रिसॉर्टमध्ये होत असलेल्या कथित वीजचोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महावितरणच्या राजगुरुनगर विभागाचे उपकार्यकारी अभियंता उत्तम मंचरे, कनिष्ठ अभियंता अजय पोफळे व त्यांच्या पथकाने २ जुलै रोजी रिसॉर्टवर तपासणी केली. या तपासणीत वीजचोरीचा प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर रिसॉर्ट मालक भाग्यश्री राजेंद्र भालेराव यांना वीजचोरीप्रकरणी दंडात्मक कारवाईसह ८ लाख २ हजार ८७० रुपयांचे बिल बजावण्यात आले.
महावितरणच्या नियमानुसार, वीजचोरीचे बिल ४८ तासांत न भरल्यास संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अपेक्षित असते. संबंधित रक्कम निर्धारित मुदतीत न भरल्याने अखेर खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित रिसॉर्ट मालक किंवा अन्य संबंधितांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात कारवाई उशिरा झाल्याचा आरोप होत आहे. तसेच रिसॉर्टमध्ये प्रत्यक्ष असलेल्या सुविधा आणि तपासणीदरम्यान नोंदविलेल्या सुविधांमध्ये तफावत असल्याचा दावा काही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. रिसॉर्टमध्ये अधिक खोल्या, स्विमिंग पूल, बोरवेल, विद्युत मोटारी व इतर सुविधा असूनही त्यांची पूर्ण नोंद झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईच्या स्वरूपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वांद्रा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असून गेल्या काही वर्षांत अनेक बाहेरील व्यक्तींनी येथे फार्महाऊस, बंगले व रिसॉर्ट उभारले आहेत. त्यामुळे या भागात अनधिकृत वीज वापर आणि वीजचोरीच्या प्रकारांवर महावितरणने व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





