MSEDCL Monsoon Alert: पावसाळ्यात घराबाहेर पडताना ‘ही’ चूक पडेल भारी; महावितरणने दिला मोठा इशारा
MSEDCL Monsoon Alert: पावसाळ्यात वीज अपघातांचा धोका वाढला; ओल्या हाताने उपकरणे न वापरण्यासह महावितरणकडून नागरिकांना सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन.

MSEDCL Monsoon Alert – पावसाळा हा निसर्गाच्या नवचैतन्याचा आणि शेतीसाठी जीवनदायी ऋतू आहे. मात्र, या ऋतूमध्ये वीज अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. मुसळधार पाऊस, वादळी वारे, पाणी साचणे, ओलसर वातावरण, झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडणे तसेच वीज कोसळण्याच्या घटनांमुळे विद्युत सुरक्षेला विशेष महत्त्व प्राप्त होते. थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.
त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी तुटलेल्या वीजवाहिन्यांपासून दूर राहवे, रस्त्यावर किंवा शेतात तुटलेली वीजवाहिनी दिसल्यास तिच्या जवळ अजिबात जाऊ नये किंवा स्पर्श करू नये. इतरांनाही दूर ठेवत त्वरित महावितरणला माहिती द्यावी.ओल्या हाताने स्वीच, प्लग किंवा कोणतेही विद्युत उपकरण चालवू नका.
ओल्या जमिनीवर उभे राहून विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळा. घरातील जुनी, सैल किंवा खराब झालेली वायरिंग, प्लग, स्वीच यांची वेळोवेळी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करून घ्या. परवानाधारक विद्युत तंत्रज्ञाचीच मदत घ्या, घरातील विद्युत यंत्रणेला योग्य अर्थिंग असल्यास विद्युत धक्का बसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर, वितरण पेटी किंवा स्ट्रीट लाइटजवळ पाणी साचले असल्यास त्या परिसरात जाणे टाळा.
लहान मुलांना पावसात वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत उपकरणांजवळ खेळू देऊ नका. त्यांना विद्युत सुरक्षिततेबाबत माहिती द्या. जोरदार वादळ किंवा विजांच्या कडकडाटावेळी शक्यतो घरातच राहा. उघड्या जागेत किंवा एकट्या झाडाखाली उभे राहणे टाळा. स्पार्किंग, तुटलेली वीजवाहिनी, झुकलेला वीज खांब, ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड किंवा इतर कोणतीही धोकादायक बाब दिसल्यास त्वरित महावितरणच्या कार्यालयाशी किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा,
असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेची तपासणी, वीजवाहिन्यांलगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, ट्रान्सफॉर्मर व विद्युत उपकरणांची देखभाल, दोषग्रस्त साहित्याची बदली आणि आपत्कालीन पथकांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, ग्राहकांचे सहकार्य आणि जागरूकता हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
वीज विकासाची ऊर्जा असली तरी तिचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील आणि पावसाळा सुरक्षित व आनंददायी ठरेल. तुटलेली वीजवाहिनी, स्पार्किंग किंवा इतर कोणतीही विद्युत धोक्याची बाब आढळल्यास तत्काळ महावितरणला कळवा. आपल्या एका फोनमुळे एखाद्याचा अमूल्य जीव वाचू शकतो.






