Volodymyr Zelenskyy : रशियाला आर्थिक धक्का देऊन युद्ध थांबवावे.! संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत झेलेन्स्की यांचे आवाहन
रशियाला युद्धासाठी पैसा आणि संसाधने उपलब्ध होत राहिल्यास मुत्सद्देगिरीला नकार दिला जातो, असा दावा झेलेन्स्की यांनी केला.

Volodymyr Zelenskyy : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जागतिक नेत्यांना रशियाचा महसूल रोखून आणि त्याच्या युद्ध क्षमतेवर निर्बंध आणून मॉस्कोवर शांततेसाठी दबाव वाढवण्याचे आवाहन केले.
रशियाला युद्धासाठी पैसा आणि संसाधने उपलब्ध होत राहिल्यास मुत्सद्देगिरीला नकार दिला जातो, असा दावा झेलेन्स्की यांनी केला. त्यांचा पैसा मर्यादित करा. म्हणजेच युद्ध मर्यादित होइल, असे ते म्हणाले. या युद्धातील प्रमुख अडथळा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी रशिया आणि युक्रेनने मर्यादित युद्धविरामाच्या शक्यतेत रस दाखवल्याचे सांगितले. धान्य वाहतूक तसेच ऊर्जा क्षेत्रावरील हल्ले थांबवण्याबाबत अशा कराराचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. (Volodymyr Zelenskyy)
अमेरिकेने या प्रक्रियेला मदत करण्याची तयारी दर्शवली. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाची लष्करी कारवाई थांबवण्यास नकार दिला. अशा विश्रांतीचा फायदा युक्रेनला अधिक शस्त्रे मिळवण्यासाठी होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.
झेलेन्स्की यांनी युक्रेनने या वर्षात ६३ हजार ड्रोन हल्ले सहन केल्याचे सांगितले. तसेच, रशियाच्या शाहेद ड्रोनविरोधात जेट-चालित इंटरसेप्टर ड्रोनची चाचणी घेतल्याची माहिती दिली. स्वायत्त शस्त्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.





