Pune News : वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई ! गावठी पिस्टलसह तरुणाला अटक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला (Pune News) ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला आहे.

Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वालचंदनगर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला (Pune News) ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला आहे. चेतन राजू लोंढे (वय २०, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांकडून परिसरात पेट्रोलिंग आणि तपासणी सुरू होती.
१७ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पोलीस हवालदार (Pune News) गणेश काटकर आणि गणेश झरेकर हे पेट्रोलिंग करत असताना बेलवाडी फाटा परिसरात एक तरुण कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह बेलवाडी बसस्थानक परिसरात शोध घेतला. तेथे वर्णनाशी मिळताजुळता तरुण आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे पिस्टल आणि खिशात एक जिवंत राऊंड आढळून आला. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त केल्या.
या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश काटकर यांच्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश झरेकर करत आहेत.
ही कारवाई (Pune News) पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गणेश काटकर, गणेश झरेकर, किर्तीलाल गायकवाड, अमोल गायकवाड, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर आणि अजित राऊत सहभागी झाले होते.






