Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या सहायक फौजदाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा (Pune News) मृत्यू झाला.

Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या सहायक फौजदाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा (Pune News) मृत्यू झाला. गणेश रतन दाभाडे (वय ४९, रा. सासवड, ता. पुरंदर) असे मृत सहायक फौजदाराचे नाव आहे. ते उरुळीकांचन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ही घटना शनिवारी (१९ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उरुळीकांचन येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर पुणे-सोलापूर महामार्गावर घडली.
दाभाडे हे रस्ता पायी ओलांडत असताना भरधाव वेगातील (Pune News) अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आशिष उल्हाळकर यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४ आणि १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास (Pune News) सुरुवात केली असून, पसार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.






