पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. महिलेेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नणंदेच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१), विष्णु शशिकांत देशमुख (वय ६) अशी या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत. आत्महत्या प्रकऱणाची नोंद आंबेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी एका खासगी शाळेत बालवाडीत शिक्षिक होत्या. त्यांचे पती शशिकांत हे एका बँकेत नोकरी करत आहेत. देशमुख कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. देशमुख कुटुंबीय आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सृष्टी सोसायटीत राहायला आहे. विष्णू त्यांचा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मयुरीने पाचव्या मजल्यावरुन सहा वर्षांचा मुलगा विष्णू याच्यासह उडी मारली. त्या वेळी मयूरी यांचे पती घरात नव्हते. आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णू हे सोसायटीतील आवाारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोालीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मयुरीने यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. नणंदेच्या त्रासामुळे आत्महत्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत मयूरी यांनी नमूद केले.