Pune News | कात्रज-कोंढवा रस्त्यावरील रुंदीकरणाला गती ; महापालिकेने २७० कोटींचा निधी मंजूर केला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्याचे गेल्या आठ वर्षांपासून रखडलेले रुंदीकरण आता वेग घेणार आहे. भूसंपादनासाठी रोख निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने २७० कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २२० कोटी रूपये विविध विभागांमधून वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले असून स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील रुंदीकरणाच्या कामांना गती येणार आहे.हडपसर ते कात्रज या दक्षिण पुण्यातील भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण असून कात्रज-कोंढवा रस्ता हा या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा आहे. २०१७ मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, जागा ताब्यात नसताना प्रकल्पाची घोषणा केल्याने तो रखडला. आठ वर्षांत या कामाचे ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.
या विलंबामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.रुंदीकरणासाठी ८४ मीटरपैकी ५० मीटरचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यासाठी अनेक खासगी जमिनी ताब्यात घेणे गरजेचे आहे. महापालिकेने जमीन मालकांना मोबदला म्हणून ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स (टीडीआर) आणि फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) देण्याचा पर्याय दिला होता.
मात्र, नागरिकांनी तो नाकारल्याने अखेर प्रशासनाला रोख रक्कम देऊनच भूसंपादन करावे लागत आहे.राज्य शासनाकडून गेल्या वर्षी भूसंपादनासाठी १३९ कोटी रूपये मिळाले. या निधीतून काही जागा ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, मोठ्या प्रमाणावर जमीन मालकांनी भूखंड उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे उर्वरित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून विशेष समिती स्थापन केली आहे. यामुळे या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
या भूसंपादनासाठी एकूण २७० कोटी रूपयांची गरज आहे. त्यापैकी ५५ कोटी रूपयांचा निधी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे आधीपासूनच उपलब्ध आहे. उर्वरित निधी उपलब्ध करण्यासाठी पथविभागाकडून १६० कोटींचे वर्गीकरण, तर प्रकल्प विभाग, शहर अभियंता विभाग आणि भवन रचना विभागाकडून प्रत्येकी २० कोटी रूपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने आज मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे आता कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे वेगाने होणार आहे. भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून नागरिकांना वाहतुकीतून दिलासा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. – अनिरूध्द पावसकर, पथ विभाग प्रमुख





