Pune News : जपानच्या आंब्याला पुणेरी गोडवा! ‘मियाझाकी’ आंबा पिकवलाय हडपसरच्या शेतकऱ्याने

– विवेकानंद काटमोरे (प्रतिनिधी)
हडपसर : आंब्याचा हंगाम सुरू होताच देशभरातील आंबाप्रेमी हापूस, पायरी, लालबाग आणि केशर सारख्या हंगामी आंब्यांचा आनंद घेतात. पण हडपसर – सय्यदनगर येथील एका शेतकऱ्याने जपानमधील जगप्रसिद्ध मियाझाकी आंब्यासह दुर्मिळ आणि विदेशी जातींची लागवड करून, आंब्याबद्दलची आपली आवड जागतिक स्तरावर नेली आहे.
आपल्या शेतात आंब्याच्या शेकडो जाती लावून एक वेगळा प्रगतशील शेतीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. फारुखभाई इनामदार समाजकारण,राजकारण आणि तितक्याच मेहनतीने प्रयोगशील शेती करणारे माजी नगरसेवक फारुखभाई इनामदार यांनी त्यांच्या वरवंड येथील काही गुंठे जमिनीवर १२० आंब्याची झाडे यशस्वीरित्या लावली आहेत.
यापैकी ९० आंतरराष्ट्रीय जाती आहेत, तर ३० मूळ भारतातील आहेत.त्यांच्या या कामात त्यांची मुले अफान व सुफियान इनामदार हेही तितक्याच आवडीने या आंबा फळबागेची काळजी घेत आहेत. इनामदार यांच्या बागेत मियाझाकी आंबा आहे, जो त्याच्या अत्यधिक किंमतीसाठी प्रसिद्ध आहे, जपानमध्ये प्रति किलो २.७ लाख रुपये आणि भारतात सुमारे १.५ लाख रुपये प्रति किलोला मिळतो.
या दुर्मिळ प्रजातींच्या लागवडीचा फारूकभाई इनामदार यांचा प्रवास हज यात्रेदरम्यान सुरू झाला, जिथे त्यांनी जगभरातील विविध आंब्यांची रोपे पाहिली. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी विविध देशांमधून रोपे आयात केली आणि पुण्यातील त्यांच्या शेतात ती रोपे लावण्यास सुरुवात केली.
दोन वर्षांनंतर, झाडांना यशस्वीरित्या फळे आली आहेत, आता त्याच्या शेतात रेड आफ्रिकन, रेड तैवान, अरुणिका, केळी आंबा, ऑस्ट्रेलियातील ए२ आर२, बांगलादेशातील काटोमोनी आणि शाहजहान आणि लोकप्रिय मियाझाकी यासारख्या जागतिक जाती आहेत. बहुतेक विदेशी आंब्यांची किंमत किलोमागे काही हजार रुपये असते, तर मियाझाकी त्याच्या प्रीमियम किमतीसाठी वेगळे आहे.
एका किलोमध्ये चार ते सहा आंबे असतात, प्रत्येकाचे वजन सुमारे ३०० ग्रॅम असते. इनामदार यांनी “कोयातूर” या आणखी एका उच्च उत्पादन देणाऱ्या झाडावरही प्रकाश टाकला, जे दर हंगामात ८-१० किलो आंबे देते आणि प्रति फळ १,५०० ते ५,००० रुपयांपर्यंत किंमत देते.
समाजकारण, राजकारण करत असतानाच याहीपेक्षा अधिकची शेतीची आवड मला पहिल्यापासूनच आहे. आता 120 प्रकारचे देशी आणि विदेशी आंब्याची झाडे आहेत.याशिवाय जांभूळ ,जाम ,पेरू, पपई ,लिची ची फळ झाडे लावली असून त्यापासून चांगले उत्पादन मिळत आहे.यापुढेही जगभरातील आणखी दुर्मिळ आंब्यांच्या जातींची लागवड करण्यात येणार आहे.
– फारुखभाई इनामदार (प्रगतशील शेतकरी)




