Pune News : जैन बोर्डिंग प्रकरणामागे केवळ योगायोग की राजकीय डावपेच? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रभात वृत्तसेवा
पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनीच्या परिसरातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा विक्री प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असले तरी या प्रकरणात थेट पुण्यातील एका नेत्यावर आरोप झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्थगिती मिळाली का, अशी चर्चा विविध माध्यमांतून होताना दिसते आहे. या जागेच्या प्रकरणावरून शांतताप्रिय असलेल्या जैन समाजाने मोर्चा काढत आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर प्रकरण राज्यभर गाजले व अचानक ही स्थगिती मिळाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजीनगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग आहे. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते, तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे.
पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याच्या आरोपांनी वातावरण ढवळून निघाले. तर या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बिल्डर आणि काही नेत्यांनी मिळून जागा विकल्याचा आरोप केला.
त्यामुळे सोशल मिडियासह माध्यमांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने हा विषय राज्यस्तरावर पोहोचला. तर या सर्व प्रक्रियेत मान्यता देण्यासाठी शासकीय कार्यालयांनी दाखविलेल्या तत्परतेवर बोट ठेवण्यात आले. आठवड्यात शासनस्तरावर विक्रीची मान्यता मिळणे, बँकेने दोन दिवसात कोट्यावधीचे कर्ज मंजूर करणे अशा अनेक बाबींवर संशय व्यक्त केला.
त्यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर होणारे आरोप आणि दुसरीकडे राज्यशासनाच्या स्तरावर मिळालेल्या मान्यता या वरून राजकीय आरोपांची राळ उठली. परिणामी, हा विषय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय मुद्दा झाल्यास सत्ताधाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच ही स्थगिती देण्यात आली ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या गतीमान घडामोडी या चर्चांना आणखी हवा देणाऱ्याच ठरल्या.





