Pune News : गुंतवणूकदारांची फसवणूक: माजी नगरसेवकासह पुत्राचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

पुणे : गॅस एजन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी माजी अध्यक्ष व माजी नगरसेवकासह पुत्राचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे.
यापूर्वी त्यांचा अर्ज येथील विशेष न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमुर्ती प्रसन्ना वराळे यांच्या खंडपीठाने ही निकाल दिला.
माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) आणि मुलगा मयुरेश जोशी (वय ४६) यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. फिर्यादीतर्फे अॅड. आशिष पाटणकर आणि ॲड. शंतनू फणसे यांनी सरकारी पक्षाला सहकार्य केले.
आरोपी मयुरेश जोशी याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाची खोटी प्रमाणपत्रे फिर्यादी यांना देऊन अनेकांची फसवणूक केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जोशी पिता-पुत्रावर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेला आदेश योग्य, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने जोशी पिता-पुत्राचा अर्ज निकाली काढला.




