Pune News | भारतीय सैनिकांकडून दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये गणेशोत्सवात सहभागी होता येता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील ३३, ६, १९, १, १०१ इन्फन्ट्री आणि ७१ इन्फन्ट्री युनिटच्या सैनिकांना अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी आणि राजस्थान येथे गणेशोत्सवात दगडूशेठ मूर्तीची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्यास देण्यात आल्या आहेत.
सीमावर्ती भागात दगडूशेठच्या श्रीं ची प्रतीकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा या बटालियनच्या सैनिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. यावर ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहूब दोन फुटी प्रतीकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे उपस्थित होते.
मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठवले होते.
सलग १५ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकात्मक गणेशमूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागांत केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे या मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत, असे रासने यांनी सांगितले.




