Pune News : पाडुळे टोळीच्या म्होरक्याचे अवैध ‘मातोश्री हॉटेल’ बुलडोझरने जमीनदोस्त
हे हॉटेल टोळीसाठी आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन असून परिसरातील गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Pune News : भारती विद्यापीठ पोलिसांनी कुख्यात पाडुळे टोळीचा म्होरक्या मनोज पाडुळे याच्या आर्थिक नेटवर्कवर मोठा प्रहार करत सिंहगड कॅम्पस परिसरातील त्याचे अवैध ‘मातोश्री हॉटेल’ बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. हे हॉटेल टोळीसाठी आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन असून परिसरातील गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मकोका गुन्ह्यात फरार असलेला आरोपी मनोज पाडुळे (रा. सिंहगड कॅम्पस) आणि त्याच्या टोळीला आर्थिक मदत करण्यासाठी या हॉटेलचा वापर केला जात होता. त्यानुसार कारवाई करत अवैधरित्या उभारलेले हॉटेल पाडण्यात आले.
तपासात सिंहगड कॅम्पस परिसरातील हे हॉटेल दीर्घकाळापासून गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनल्याचे समोर आले. टोळीचे सदस्य येथे वारंवार जमून विविध गुन्हेगारी हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिसरातील गुन्हेगारी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत कमी करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या नोंदीनुसार, मनोज पाडुळे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण तसेच इतर गंभीर स्वरूपाचे सुमारे १५ गुन्हे दाखल आहेत. सिंहगड कॅम्पस आणि परिसरात त्याच्या टोळीची दहशत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि टोळीचे आर्थिक स्रोत उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





