India-Japan partnership : भारत-जपान भागीदारीत नवे पर्व; वर्षभरात 100 पेक्षा जास्त व्यापारी करार, 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
भारत आणि जपान यांनी संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करत एआय आणि ऊर्जा क्षेत्रातील विविध महत्तवपूर्ण करारावर स्वाक्षरी करत भागीदारीत नवे पर्व सुरू केले आहे.

India-Japan partnership – भारत आणि जपान यांनी संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करत एआय आणि ऊर्जा क्षेत्रातील विविध महत्तवपूर्ण करारावर स्वाक्षरी करत भागीदारीत नवे पर्व सुरू केले आहे. यामध्ये आर्थिक भागीदारी आराखडा आणि लष्करी उपकरणांच्या संयुक्त विकासासाठी संरक्षण कराराचा समावेश आहे.
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या करारांमुळे हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत आणि जपान धोरणात्मक भागिदारीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि जपानच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक आहेत. सांस्कृतिक मूल्यांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत आमच्या विचारसरणीत आणि दृष्टिकोनातही साम्य आहे. तसेच दोन्ही देशाच्या संबंधांचा पाया अतूट परस्पर विश्वासावर आधारलेला आहे. यातून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये वाढत असलेली एकरूपता दिसून येते.
जपानचे अचूक तंत्रज्ञान आणि भारताची सॉफ्टवेअर क्षमता यांचा संगम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात नवी गती आणि बळ देईल. दोन्ही बाजूंनी आर्थिक सुरक्षेसाठी एक संयुक्त कृती आराखडा (रोडमॅप) तयार केला आहे. याद्वारे सेमीकंडक्टर्स, क्वांटम आणि प्रगत सामग्री (ॲडव्हान्स्ड मटेरियल्स) यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये पुरवठा साखळीची लवचिकता आणि क्षमता बळकट करण्यात येईल.
भारत आणि जपानने ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भारत-जपान बायोगॅस उपक्रमाद्वारे देशात एक हजार बायोगॅस आणि सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्यात येईल. यामुळे देशातील गावांमध्ये शाश्वतता, समृद्धी आणि ग्रामीण उपजीविकेला नवी बळकटी मिळेल, असे ते म्हणाले.
भारत आणि जपान हे दोन्ही देश आज जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहेत. एक मुक्त, समृद्ध आणि नियमांवर आधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्र ही आमच्या सामायिक प्राधान्यक्रमाची बाब आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या लोकशाही आणि बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणून आज आम्ही अनेक महत्त्वाचे पुढाकार घेतले आहेत. याद्वारे आम्ही मिळून संपूर्ण क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त करू.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२०१४ मध्ये भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. २०२७ मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असताना व्यापार आणि गुंतवणूक, आर्थिक सुरक्षा, संरक्षण आणि सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती तसेच जनसंपर्क यांसारख्या विविध क्षेत्रांत सहकार्य अधिक दृढ होत आहे.
– सानाए ताकाइची, जपानच्या पंतप्रधान






