Deool Band 2 : ‘देऊळ बंद २’ने १०० कोटी कसे कमावले? प्रवीण तरडेंची अनोखी शक्कल ठरली गेमचेंजर, सांगितलं मोठं गुपित
मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या सिनेमाने तब्बल १०० कोटींचा टप्पा पार करत मोठा माईलस्टोन गाठला आहे.

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ या सिनेमाने तब्बल १०० कोटींचा टप्पा पार करत मोठा माईलस्टोन गाठला आहे.
कमी बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा मराठीत १०० कोटी कमावणाऱ्या मोजक्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. पण हा आकडा इतका सहज आलेला नाही त्यामागे आहे वेगळ्या विचारांची, स्ट्रॅटेजीची आणि प्रचंड मेहनतीची कहाणी. स्वतः प्रवीण तरडे यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडेंनी या यशामागचं खरं गुपित उलगडलं. त्यांच्या मते, “फक्त पारंपरिक बॉक्स ऑफिसवर अवलंबून न राहता नवीन आयडिया आणि वितरणाचे वेगळे मार्ग स्वीकारणं” हेच या यशाचं मुख्य कारण होतं.
चित्रपटाने थिएटर रिलीजसोबतच अनेक नवे प्रयोग केले. ज्या भागात चित्रपटगृहे उपलब्ध नाहीत, तिथे खास ‘तंबू थिएटर’ उभारून अत्यल्प तिकीट दरात शो आयोजित करण्यात आले.
या अनोख्या प्रयोगातून सुमारे साडेचार कोटींचं कलेक्शन झाल्याचं ते सांगतात. तसेच ज्या भागात थिएटर नाही तिथे स्वामींच्या सेवाकेंद्रात जाऊन आम्ही २५,३०,४० रुपयांत सिनेमा दाखवला.
परदेशात मराठी सिनेमाचा झेंडा :
याशिवाय ‘देऊळ बंद २’ने जागतिक स्तरावरही जोरदार कामगिरी केली. अमेरिकेत सर्वाधिक शो झाले, तर जर्मनी, कॅनडा, जपान, सिंगापूर, नेदरलँड आणि दुबई यांसारख्या देशांमध्येही विशेष स्क्रीनिंग्ज घेण्यात आले. परदेशातील या शोमधून जवळपास साडेसात ते आठ कोटी रुपयांचं कलेक्शन मिळालं.
प्रेक्षकांशी थेट जोडलेला प्रवास :
प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या रिलीजनंतर जवळपास ५० दिवस सतत देशभरातील थिएटरला भेटी दिल्या. कोणत्याही मोठ्या टीमशिवाय, मोबाईल हातात घेऊन ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. प्रत्येक शोला उपस्थित राहून त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला, फोटो घेतले आणि चित्रपटाबद्दल थेट फीडबॅक घेतला.
मेहनत, प्रयोग आणि नवा विचार :
“हे यश अचानक मिळालेलं नाही,” असं ते स्पष्टपणे सांगतात. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन केलेले प्रयोग, प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्याची रणनीती आणि सातत्यपूर्ण मेहनत या सगळ्यांच्या जोरावर ‘देऊळ बंद २’ने १०० कोटींचा टप्पा पार केला. मराठी सिनेमासाठी हा केवळ व्यावसायिक यशाचा नाही, तर नवीन मॉडेल तयार करणारा टप्पा मानला जात आहे.






