Pune News | प्रभाग रचनेची तक्रार न करता स्वबळावर निवडणुकीसाठी सज्ज व्हा – अजित पवार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रभाग रचनेत काय झाले? काय नाही, यावर आता रडत बसू नका, जसे आहे तसे मान्य करून, युतीची वाट न पाहता स्वबळावर लढण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांना सुनावले. पालिकेत काँग्रेसची सत्ता होती तेव्हा प्रभाग रचना सुरेश कलमाडीच ठरवायचे. असे असतानाही आपण निवडून येत होतो, हे विसरू नका आणि तयारीला लागा, असे सांगत त्यांनी नगरसेवकांना धीरही दिला.
महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीस शहराचे प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीस माजी नगरसेवकांनी प्रभाग रचनेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात मोठी मोडतोड झाली असून ही प्रभाग रचना केवळ भाजपला अनुकूल असल्याच्या तक्रारी मांडल्या. तसेच भाजपने विश्वासात घेतले नसल्याची तक्रारही करण्यात आली. याशिवाय, पुण्यात महायुती होणार की नाही, हे स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर पवारांनी प्रभाग रचनेवरून नगरसेवकांचीच कानउघडणी केली.
काहींनी मदत केली नाही..
प्रभाग रचनेबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगितले होते. स्थानिक पातळीवर याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र, स्थानिक पातळीवर काही लोकांनी आपल्याला मदत केली नाही. आपण मात्र त्यांना लोकसभा, विधानसभेसाठी मदत केली. प्रत्यक्षात खाली वेगळाच प्रकार घडला. त्यामुळे आता आपणही तीन महिन्यांत आपल्या पद्धतीने पुढे जाऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील स्थानिक नेत्यांची नावे घेत त्यांनी राग व्यक्त केला.
तीन महिने महत्त्वाचे..
आता प्रभाग रचनेबाबत आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रभाग रचनेवर हरकती घ्या, पण त्याचवेळी युती होण्याची वाट न पाहता स्वबळाची तयारी करा. निवडणुकांसाठी शेवटचे तीन महिने महत्त्वाचे असतात. या कालावधीत लोकांपर्यंत पोहोचल्यास तुम्हाला निवडून येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. पालिकेत सत्तेत असताना काँग्रेसच्या विरोधात आपण खड्डे, बीआरटीसारखे प्रश्न उपस्थित करत निवडून आलो. आपण पिंपरी-चिंचवडही मिळवले. त्यामुळे आता पुण्यातही हेच करा, असा सल्ला देत पवारांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक पातळीवर भाजपच्या विरोधात प्रश्न मांडण्याचा सल्लाच माजी नगरसेवकांना दिला.





