Pune News: शिवाजीराव भोसले बँक घोटाळ्याप्रकरणी माजी सरपंचाला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणातील सहआरोपी असलेला माजी सरपंच राहुल टाकळकर याला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी जामीन मंजूर केला. शिवाजीराव भोसले बँक करोडो रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये माजी आमदार अनिल भोसले आणि मंगलदास बांदल आरोपी आहेत.
यात राहुल टाकळकर याला आर्थिक गुन्हे शाखेने तपास दरम्यान दि. १६ मार्च २०२२ रोजी अटक केली होती. आरोपी राहुल टाकळकर हे हिवरे कुंभार (तालुका शिरुर) येथील माजी सरपंच आहेत. आरोपी राहुल टाकळकरचा जामीन अर्ज पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर आरोपीने अॅड. सुजय पळशीकर आणि अॅड. निलेश वाघमोडे यांच्यामार्फत जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे अर्ज केला.
आरोपीची बाजू ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण आणि अॅड. सुजय पळशीकर, अॅड. निलेश वाघमोडे यांनी मांडली. आरोपी राहुल टाकळकर याचा आरोप केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराशी काही एक संबंध नाही. राहुल टाकळकर नावाने लोन काढून त्याचे व्यवहार हे बँकेचे चेअरमन अणि इतर लोकांच्या नावाने झाले व बँकमध्ये इतर नावाने फिरवले गेले आहेत, तसा ऑडिट रिपोर्ट आहे.
राहुल टाकळकर याचा फक्त वापर केला गेला आहे. त्याच्या निव्वळ बँक अकाउंटमधून कॅश उचल केली आणि जमा केली म्हणून तो गुन्हा होत नाही. आरोपी हा मार्च २०२२ पासून कारागृहात आहे. तपास पूर्ण झाला आहे आणि आरोपी विरुद्ध चौथे पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले आहे.
तसेच संपूर्ण गुन्हा हा कागदोपत्री पुराव्यावर आधारित आणि खटला सुरू केव्हा होईल आणि संपेल याची शाश्वती नाही, अशा परिस्थिती आरोपीला कारागृहामध्ये ठेवणे कायद्याला अनुसरून नाही, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.





