Pune News : आधी खड्डे बुजवा, मग सायकल ट्रॅकचे स्वप्न दाखवा ; शिवसेनेचा महापालिका आयुक्तांना टोला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहरात एकूण ७५ किलोमीटर सायकल मार्गांचे जाळे उभारण्याचा संकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयावरून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांचे लक्ष शहरातील खड्ड्यांकडे वेधले आहे. सायकल मार्गांचे जाळे उभारणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, ती सायकल पुणेकरांनी खड्ड्यातूनच चालवायची का, असा सवाल भानगिरे यांनी उपस्थित केला आहे.महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अलीकडेच सांगितले, की पुणे हे सायकल संस्कृतीसाठी प्रसिद्ध शहर आहे.
आता ही परंपरा पुन्हा उजळविण्याची वेळ आली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित सायकल प्रवास व्हावा, यासाठी शहरभर सुमारे ७५ किलोमीटर सायकल मार्गांचे जाळे उभारले जाईल.या संकल्पनेचे स्वागत करताना भानगिरे यांनी म्हटले, की पुण्यासारख्या शहरासाठी सायकल मार्ग असणे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे; परंतु सध्याची परिस्थिती वेगळीच आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असो वा उपनगरे, सर्वच ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
नुकतीच समाविष्ट झालेली गावेही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे सायकल चालवण्यापूर्वी ती सायकल धावेल, असा गुळगुळीत रस्ता तयार करणे आवश्यक आहे. पुणेकर नागरिक आज जीव मुठीत घेऊन रस्त्यातून प्रवास करत आहेत. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे, की वाहनधारकांपासून पादचाऱ्यांपर्यंत सर्वांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सायकल मार्गांचा विचार करण्यापूर्वी शहरातील विद्यमान रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





