Pune News : अंतिम प्रभाग रचना मंजूर! ८–१० प्रभागांच्या सीमारेषा बदलल्याची चर्चा जोरात ; गॅझेट येताच चित्र होणार स्पष्ट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची अंतिम प्रभाग (वॉर्ड) रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली आहे. मान्यवर प्राधिकृत अधिकारी यांच्या अहवालावर आधारित ही मान्यता देण्यात आली असून अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट पब्लिकेशन सोमवारपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.यावेळची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनुसार होणार असून एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या.
तब्बल ६ हजार हरकती प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ८२८ नागरिकांनी सुनावणीस हजेरी लावली होती. सुनावणीदरम्यान नैसर्गिक हद्दींचे पालन न केल्याचे, प्रभागांची मनमानी मोडतोड झाल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात आले. या बदलांचा आगामी आरक्षण प्रक्रियेवरही परिणाम होणार असल्याचे सूचित करण्यात आले होते.हरकतींची सुनावणी झाल्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम रचना आयोगाकडे पाठविण्यात आली होती, त्यास आता मंजुरी मिळाल्याने निवडणुकीची पुढील प्रक्रिया वेगाने होणार आहे.
दरम्यान, प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकती आणि सुनावणीनंतर शासनाने सुमारे १४ ते १५ बदल केले असल्याची चर्चा आहे. यामध्ये ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये सुधारणा, तर ८ ते १० प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल झाले आहेत. विशेषतः उपनगरांतील काही प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मुख्य बदल झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रभागांचे अधिकृत स्वरूप स्पष्ट होणार आहे.





