PMC News : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग समित्या, क्षेत्रीय कार्यालयांची हद्द तसेच परिमंडळे मागील आठवडयात निश्चित केली होती. मात्र, त्यात, महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार पुन्हा बदल केला आहे. त्यात, तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील प्रभागांत बदल करण्यात आले असून नवीन सुधारीत यादी जाहीर केली आहे. प्रामुख्याने प्रभाग २९, २२ आणि ३९ प्रभागांचे क्षेत्रीय कार्यालय बदलण्यात आले आहे. हे बदल करताना प्रशासनाने पुन्हा एकदा भाजप नगरसेवकांच्या मागणीकडे लक्ष दिले आहे. नगररस्ता तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील काही प्रभागांची क्षेत्रीय कार्यालयांची हद्द बदलण्याची मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर, सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या या मागणीला प्रशासनाने कात्रजचा घाट दाखविला असून या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कोणताही बदल केलेला नाही. असे आहेत बदल पूर्वीच्या आदेशात प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना- हॅपी काॅलनी हा छत्रपती शिवाजीनगर- घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून वगळून आता वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयास जोडण्यात आला आहे. प्रभाग २२ काशेवाडी- डायसप्लाॅट हा बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातून वगळून तो कसबा क्षेत्रीय कार्यालयास जोडण्यात आला आहे. प्रभाग ३९ अप्पर -सुपर इंदीरानगर हा या पूर्वी कोंढवा- उंड्री क्षेत्रीय कार्यालयास जोडण्यात आला होता. तो आता बिववेवाडी क्षेत्रीय कार्यालयास जोडण्यात आला आहे. असे तीन प्रमुख बदल प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.