Pune News : ‘प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक काम ही स्वातंत्र्यसैनिकांना खरी आदरांजली’ – डॉ. राजेश शहा
कार्यक्रमाच्या शेवटी विनोद देढिया यांनी आभार प्रदर्शन केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

Pune News – “आपण कोणतेही काम अथवा व्यवसाय करत असताना सच्चाई, सचोटी आणि प्रामाणिकपणा जपणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडल्यास, ती आपल्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल,” असे प्रतिपादन पी.जी.के.एम.चे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी केले.
८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात तत्परता, निष्ठा, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
“कोणतेही काम स्वीकारल्यानंतर ते पूर्णत्वास नेणे, समाजात वावरताना सजग आणि जबाबदार राहणे, मोठ्यांचा आदर करणे तसेच आपल्या कार्याशी निष्ठा बाळगणे या मूल्यांचे पालन केल्यास भ्रष्टाचार आणि अनैतिकतेला आळा बसण्यास मदत होईल.
अशा संस्कारातूनच आदर्श समाजाची निर्मिती होऊन खऱ्या अर्थाने रामराज्याच्या दिशेने वाटचाल करता येईल,” असे डॉ. शहा यांनी सांगितले. यावेळी विविध शाखा व विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी तसेच गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी प्राचार्य पद्मा जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक घडण्यासाठी बालपणापासूनच योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. केवळ वरवरचे शिक्षण पुरेसे नसून मूल्याधिष्ठित शिक्षणाला अधिक महत्त्व आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”
“आई-वडील, शिक्षक, परिचारिका आणि सीमेवरील जवान या चार घटकांच्या योगदानावर समाजाची घडी उभी आहे. या सर्व घटकांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेले कार्य समाज आणि पर्यायाने देश अधिक मजबूत करण्यास कारणीभूत ठरते,” असेही पद्मा जैन यांनी नमूद केले.
कार्यक्रमास पी.जी.के.एम.चे व्हाईस चेअरमन जनक शहा, सचिव हेमंत मणियार, सहसचिव दिलीप जगड, तसेच विनोद देढिया, अशोक शहा, डॉ. राजेंद्र गुरव, अनुजा सेलोट, अर्चना धारू, उर्मिला पटेल, प्राजक्ता भिडे, गीतांजली गुलापल्ली हे विविध शाखांचे प्राचार्य आणि प्रशासकीय अधिकारी संदीप देशपांडे, तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विनोद देढिया यांनी आभार प्रदर्शन केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.





