Pune News : “दुधाचा प्रत्येक घोट कत्तलखान्यांना बळ देतो;” संभाजी उद्यानासमोर प्राणीहक्क कार्यकर्त्यांचे आंदोलन
Pune News : भारतातील दूध व्यवसाय बीफ निर्यातीला खतपाणी घालत असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा; चित्रप्रदर्शनातून दुग्धव्यवसायाचे भीषण वास्तव उघड.

Pune News – भारतातील दूध व्यवसाय हा बीफ (गोमांस) निर्यातीला थेट बळ देतो. आपण पित असलेला दुधाचा प्रत्येक घोट या कत्तलखान्यांना नकळतपणे आर्थिक पाठबळ देत असतो. असे सांगत जागतिक ‘पृथ्वी दिना’चे औचित्य साधून प्राणी हक्क कार्यकर्ते रविवारी रस्त्यावर उतरले. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर चित्रप्रदर्शन आणि निदर्शना द्वारे जनजागृती केली.
सध्या देशातील २० शहरांमध्ये हे युवक ‘दूध आणि मांस एकाच प्राण्याकडून येते’ असे सांगत लक्ष वेधून घेत आहे. नागरिकांनी दुग्धव्यवसाय साखळीतून प्राण्यांचा प्रवास आणि शेवटी त्यांची मांस बाजारात होणारी विक्री यावर विचार करावा, असे आवाहन याद्वारे करण्यात आले. भारतात एक लिटर दूध उत्पादनासाठी १०७८ लिटर पाणी लागते, जे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या देशासाठी मोठे संकट आहे.
तसेच, पशुधनातून होणारे मिथेन उत्सर्जन हे जागतिक तापमानवाढीचे प्रमुख कारण मानले जात आहे, असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला. भारताला आता या अस्वस्थ करणाऱ्या सत्याचा सामना करावाच लागेल की दुग्ध आणि गोमांस (बीफ) उद्योग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून, आपण गोमांस निर्यातीतही जगात आघाडीवर आहोत.
कारण जेव्हा दुभती जनावरे अनुत्पादक ठरतात, तेव्हा त्यांना अपरिहार्यपणे कत्तलखान्यात पाठवले जाते, असे प्राणीहक्क कार्यकर्ते हर्षल मगरे म्हणाले. पुणे शहर सध्या पाणीटंचाई आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करrत आहे, तरीही आपण प्राणी आधारित शेती आणि दुग्ध व्यवसायाकडे डोळेझाक करrत आहोत. केवळ एक लिटर दुधासाठी हजारो लिटर पाणी वाया जात असेल, तर आपल्या आहाराच्या सवयी हा आता हवामान बदलाचा एक अतिशय गंभीर प्रश्न बनला आहे.
जर आपल्याला पुण्याचे भविष्य सुरक्षित आणि हवामान-अनुकूल ठेवायचे असेल, तर दुग्धजन्य पदार्थांचा त्याग करणे हा आता केवळ एक पर्याय उरलेला नसून, ती पर्यावरणाची अत्यंत तातडीची गरज बनली आहे, असे ट्विंकल ओसवाल म्हणाल्या.





