Pune News | प्रारूप प्रभाग रचना पुन्हा लांबणीवर ; पुणेकरांची प्रतीक्षा वाढली!

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळाल्यानंतर शासनाकडून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर होणार होती. मात्र, हा मुहूर्त हुकला आहे. प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाच्या शंकाचे निरसन सुरू आल्याने इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्य शासनाने प्रभाग रचना जाहीर करणे, तसेच हरकती व सूचना मागविण्यासाठी २२ ते २८ ऑगस्टपर्यंतची मुदत निश्चित केली होती. मात्र, त्यात बदल झाला असून, प्रारूप प्रभाग रचना जाहीर करणे आणि हरकती सूचना मागविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रभाग रचना जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी मुंबईत पाचारण केले होते. हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागातच होते. मात्र, दिवसभराचे सादरीकरण केल्यानंतरही अर्ध्याच प्रभाग रचनेवर चर्चा झाली असून, शुक्रवारीही दिवसभर पुन्हा सादरीकरण होणार आहे.
त्यामुळे आता प्रभाग रचना शनिवारीच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दुसरीकडे महापालिकेकडून निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील मिळाल्यास प्रभाग रचनेचे नकाशे प्रसिद्ध करण्याची तयारी पूर्ण आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करून सकाळी ११ वाजेपर्यंत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या नियोजनावरही पाणी फिरले गेले आहे.
कोण ठरणार बाहुबली?
महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता होती. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या प्रभाग रचनेत भाजपने हस्तक्षेप केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने गदारोळ केला होता. मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने निवडणुका रखडल्या. सध्या राज्यात महायुतीची सत्ता असून, मुख्यमंत्रिपद भाजपकडे आहे.
त्यामुळे प्रभाग रचना तयार करताना भाजपने हस्तक्षेप केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीही प्रभाग रचनेवर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी वरिष्ठांकडे व्यक्त केल्यानंतर ही रचना शिवसेनेकडे असलेल्या नगरविकास विभागाकडे गेली. त्यामुळे आता झालेले आरोप-प्रत्यारोप खरे होते की नव्हते, हे स्पष्ट होणार आहे.
वेळापत्रकात बदल..
नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. त्यानुसार २२ ते २८ऑगस्ट रोजी ती जाहीर करून त्यावर हरकती आणि सूचना मागविणे आणि २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत त्यावर सुनावणी घेणे असे स्पष्ट केले आहे. मात्र, आता ही वेळापत्रक बदलले असून प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर मुदत दिली आहे. हरकती आणि सूचनासाठी आता ५ ते १२ सप्टेंबर मुदत असून, अंतिम प्रभाग रचनेच्या मुदतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.




