Pune news : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, देशभक्त आणि संवेदनशील नेतृत्व’ पुरस्कार !
डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, पेट्रियॉटिक अँड कम्पॅशनेट लीडर’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.

Pune news : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘ग्लोबल व्हिजनरी एज्युकेशनिस्ट, पेट्रियॉटिक अँड कम्पॅशनेट लीडर’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील आयआयटी दिल्लीच्या रिसर्च अँड इनोव्हेशन पार्कमधील सभागृहात नुकत्याच आयोजित ‘इंडिया@२०४७ लीडरशिप, इनोव्हेशन अँड ग्लोबल पॉवर समिट २०२६’ मध्ये खासदार आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी अंडर-सेक्रेटरी-जनरल डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
आजीवन, मूल्याधिष्ठित व सर्वांगीण शिक्षण, चारित्र्यनिर्मिती तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजामध्ये देशभक्ती, संवेदनशीलता व शाश्वत मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. ‘नेतृत्व, नवोन्मेष आणि जागतिक प्रभावाच्या माध्यमातून २०४७ च्या भारताचा प्रवास घडविणे’ या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेत विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवर नेते, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, गुंतवणूकदार आणि परिवर्तनाचे शिल्पकार सहभागी झाले होते.
या परिषदेत दूरदृष्टीचे नेतृत्व, तंत्रज्ञान व नवोन्मेष, आर्थिक विकास, शिक्षण, जागतिक प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय मुसद्देगिरी अशा विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. तसेच शिक्षण, उद्योग, सामाजिक विकास आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे मान्यवर नेते, शिक्षणतज्ज्ञ, नवोन्मेषक आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते डॉ. शशी थरूर यांनी भारताच्या २०४७च्या वाटचालीवरील चर्चेला व्यापक दृष्टिकोन आणि महत्त्वपूर्ण विचारांची जोड दिली. मुत्सद्देगिरी, सार्वजनिक धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, साहित्य आणि प्रशासन क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे डॉ. थरूर यांनी जागतिक पटलावरील भारताचे बदलते स्थान अधोरेखित केले. २०४७ पर्यंत भारताला जागतिक प्रभावशाली राष्ट्र म्हणून उदयास आणण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्व, विचारसरणी आणि संस्थात्मक क्षमता याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेला असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे सहसचिव डॉ. आलोक कुमार मिश्रा, ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लिमिटेडचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष मेजर हेमेंद्र कुमार सिंह (निवृत्त), द नारायणी फाउंडेशनचे संचालक आदित्य शुक्ला, फॉक्स मंडलचे वरिष्ठ भागीदार एस. टी. प्रशांता कुमार, संजय स्पीच, हिअरिंग अँड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक एसएलपी संजय कुमार, ला डेन्सिटे क्लिनिक लिमिटेडचे संस्थापक व संचालक डॉ. गजानन आनंद जाधव, प्लेक्सस न्यूरो अँड स्टेम सेल रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. नईम सादिक, एरिओन भारतचे (एबी जिऑन प्रायव्हेट लिमिटेड) संस्थापक व संशोधन प्रमुख एन. प्रवीण आदी उपस्थित होते.
डॉ. संजय बी. चोरडिया हे जागतिक स्तरावर ख्यातीप्राप्त शिक्षणतज्ज्ञ, ग्लोबल कोच, उद्योग व व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ, दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आणि समाजसेवक म्हणून परिचित आहेत. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर त्यांचा विशेष भर आहे. ज्ञानवर्धक आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाच्या माध्यमातून शांतता व सामाजिक सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने ते सातत्याने कार्यरत आहेत.
डॉ. संजय बी. चोरडिया हे जागतिक विचारसरणी आणि भारतीय मूल्यांचे प्रतीक असून, शिक्षण क्षेत्राकडे परिवर्तनवादी दृष्टिकोनातून पाहणारे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी आदर्श शिक्षणाची संकल्पना पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कठोर शैक्षणिक निकषांसोबतच नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा समन्वय साधत त्यांनी शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. उद्योग क्षेत्राशी व्यापक संवाद, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सर्वांगीण शैक्षणिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून आत्मविश्वासपूर्ण, सर्जनशील आणि कृतीशील व्यक्तिमत्त्वांची निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
यापूर्वीही २०१२ मध्ये डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते डॉ. चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले होते. यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला ‘पुण्यातील उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम एकात्मिक कॅम्पस’ म्हणून गौरविण्यात आले होते. या शिखर परिषदेदरम्यान कार्यक्रमापूर्वी डॉ. चोरडिया यांना डॉ. शशी थरूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादात डॉ. थरूर यांनी पुणे हे आपल्या आवडत्या शहरांपैकी एक असल्याचे सांगत, पुण्यातील सूर्यदत्ता कॅम्पसला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली.
या शिखर परिषदेमुळे डॉ. चोरडिया यांना आयआयटी दिल्लीच्या व्यवस्थापन अभ्यास विभागातील मान्यवर व्यावसायिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सूर्यदत्त संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण याबाबत विविध शक्यतांचा यावेळी शोध घेण्यात आला.
तसेच नामवंत व्यक्तींनी सूर्यदत्त कॅम्पसला भेट देऊन तज्ज्ञ मार्गदर्शन आणि प्रेरणादायी सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असे निमंत्रणही प्रा. डॉ. चोरडिया यांनी दिले. या संवादातून शिक्षण, उद्योग आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भविष्यातील सहकार्य, ज्ञानविषयक भागीदारी आणि अर्थपूर्ण संस्थात्मक संबंध निर्माण करण्याच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.
डॉ. चोरडिया यांची दूरदृष्टी ‘विकसित भारत @२०४७’ या राष्ट्रीय संकल्पनेशी सुसंगत आहे. शिक्षण, नवोन्मेष, उद्योजकता, कौशल्ये, मूल्ये आणि जबाबदार नेतृत्व ही राष्ट्राच्या परिवर्तनाची प्रभावी साधने बनावीत, या उद्देशाने त्यांचे कार्य सुरू आहे. सूर्यदत्त परिवारातर्फे या मानाच्या सन्मानाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. संजय बी. चोरडिया यांचे अभिनंदन करण्यात आले.





