US-Iran War : अमेरिका-इराणचे एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू; इराणमधील विवाह समारंभावर अमेरिकेचा मारा
अमेरिका आणि इराणमधअये गेल्या महिन्याभरपासून संघर्ष थंडावला होता. पण मंगळवारपासून दोन्ही देशांनी एकमेकांवरचे हल्ले पुन्हा सुरू केले आहेत.

US-Iran War – अमेरिका आणि इराणमधअये गेल्या महिन्याभरपासून संघर्ष थंडावला होता. पण मंगळवारपासून दोन्ही देशांनी एकमेकांवरचे हल्ले पुन्हा सुरू केले आहेत. अमेरिकेने इराणमधील लष्करी ठिकाणांवर मारा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.
इराणमध्ये विवाह समारंभ सुरू असलेल्या एका घरावर अमेरिकेने मारा केला. त्यात पाच जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील व्यापारी जहाजांवर हल्ल्यांचा प्रयत्न केल्यानंतर हा हल्ला केल्याचे यूएस सेंट्रल कमांडने सांगितले.
रविवारी अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील लरक बेटावर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. पण ही क्षेपणास्त्रे हवेतच अडवण्यात आली. तर इराणने डागलेली ड्रोन अमिरातीनेही हवेतच अडवली होती. (US-Iran War)
मंगळवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर हल्ले झाले. ही जहाजे पर्शियन आखातातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर प्रोजेक्टाइल डागण्यात आली, असे ब्रिटीश निरीक्षकांनी म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.
दुसरीकडे इस्रायलने गाझामध्ये हमासवर केलेल्या हल्ल्यामध्ये चौघे जण ठार झाले आहेत.
विशेष सुरक्षा दलांनी घातलेल्या एका छाप्यानंतर हमासच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याला पकडण्यात आले असून यावेळी २ लहान मुलांसह चौघे ठार झाल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पकडण्यात आलेला हमासचा सुरक्षा अधिकारी गाझामध्ये हमासचे सरकार पुन्हा स्थापन करणय्साठी प्रयत्नशील होता, असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
तर येमेनमध्ये इस्लामिक स्टेटचा एक प्रवक्ता अबू हुजायफाह अल अन्सारी सौदीसमर्थित सरकारचे सैन्य आणि येमेनच्या दहशतवादविरोधी दलाच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. मेनमधील हाद्रामौत प्रांतातल्या सेयून शहरात लपून बसला होता. या कारवाईमध्ये अमेरिकेच्या सुरक्षा दलांचा काही सहभाग नव्हता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
संपूर्ण मध्यपूर्वेला सतर्कतेचा इशारा (US-Iran War)
नव्याने हल्ल्यांना सुरुवात झाल्यामुळे अमेरिकेने संपूर्ण मध्यपूर्वेतील नव्याने प्रवासी इशारा दिला आहे. मध्यपूर्वेतील बहुतेक सर्व देशांमध्ये आवश्यकता नसल्यास प्रवास करू नये, अशी मार्गदर्शक सूचना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
अमेरिकेने यापुर्वी दिलेल्या इशाऱ्यांप्रमाणेच या इशाऱ्यातही अमेरिकेच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघर्ष वाढत असल्याची चिन्हे असल्यामुळे या क्षेत्रातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता गृहित धरावी असे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
होर्मुझबाबत इराणची ओमानशी चर्चा (US-Iran War)
होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जहाजांच्या वाहतुकीबाबतची यंत्रणा विकसित करण्यासाठी इराणकडून ओमानशी चर्चा सुरू आहे. मात्र या यंत्रणेला अमेरिकेची मान्यता मिळेल का नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. होर्मुझची सामुद्रधुनी बिनशर्त खुली करण्यात यावी, अशी मागणी आखातातील इतर देशांकडून केली जाते आहे.
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी ओमानचे सुलतान हैथाम बिन तारिक यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता राखण्याच्या मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली. पण त्याबाबत खुलाससा केला गेला नाही.
अणू केंद्रांची संयुक्त राष्ट्राकडून पहाणी नाही
इराणमधील अणू प्रकल्पांची पहाणी करण्यास संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षकांना अजूनही शक्य झाले नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये १२ दिवसांचे युद्ध झाल्यापासून या निरीक्षक गटाला इराणकडून पहाणीची अनुमती मिळू शकलेली नाही.
इराणकडून अणूऊर्जा विकसित करण्यासाठी काय केले आहे आणि युरेनियम समृद्ध करण्यासाठी काय सुरू आहे, हे अद्याप सांगता येत नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीने म्हटले आहे.





