पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. निवेदिता एकबोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव यांच्याकडून त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. या नियुक्तीमुळे डॉ. एकबोटे या मॉडर्न महाविद्यालयाच्या पहिल्या महिला प्राचार्य ठरल्या आहेत. या निमित्ताने संस्थेच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी प्राचार्यपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख, सहसचिव डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, माजी प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव आणि कुलसचिव प्रा. गणेश साठे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “संस्थेने दूरदृष्टीने दिलेली ही मोठी जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी उंचवण्याचा माझा प्रयत्न राहील. काळानुसार महाविद्यालयात काही आवश्यक बदल करत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा माझा मानस आहे.” यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, “डॉ. झुंजारराव यांनी महाविद्यालयाची पायाभरणी केली आहे. आता पहिल्या महिला प्राचार्य म्हणून डॉ. निवेदिता यांच्या कार्याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यांचा पहिल्या महिला प्राचार्यांपासून ते भविष्यायत पहिल्या महिला कुलगुरूंपर्यंतचा प्रवास यशस्वी राहील, असा मला विश्वास आहे.” माजी प्राचार्य डॉ. झुंजारराव यांनी आपल्या भाषणात, महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा. शामकांत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वैजयंती जाधव यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. अंजली सरदेसाई यांनी आभार मानले.