Pune : हरियाणाचे दिनेश कुमार हे आपल्या टू-स्ट्रोक राजदूत GTS १७५ (बॉबी) मोटरसायकलवर कन्याकुमारी ते लडाख असा जवळपास ६,५०० किलोमीटरचा प्रवास करत असून हा प्रवास भारतातील ११ राज्यांतून होणार आहे. त्यांच्या या धाडसी सफरीदरम्यान ते पुण्यात आले असता पुण्यातील टू-स्ट्रोक प्रेमी राहुल मोकाशी, उदय बोधले, मोहन हलगुडे, राहुल हंकारे, संदीप कटके, चेतन नलवडे आणि इतरांनी रात्री १:०० वाजता पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराच्या आवारात दिनेश कुमार यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान, पुण्यातील टू-स्ट्रोक प्रेमींनी दिनेश कुमार यांच्या सुरक्षित प्रवासासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी प्रार्थना केली. यावेळी राहुल मोकशी, राहुल हंकारे व संदीप कटके यांनी केलेल्या आपल्या नोव्हेंबर २०२२ मधील “वेस्ट टू ईस्ट इंडिया विंटेज मोटरसायकल राईडचे” अनुभव सांगितले. जी राईड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशियन वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवली गेली आहे. या सांगितलेल्या अनुभवातून ही राईड सुरक्षित आणि सहजरीत्या पूर्ण करण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास दिनेश कुमार यांनी व्यक्त केला. पुण्यातील टू स्ट्रोक प्रेमींनी श्री. दिनेश कुमार यांना प्रवासादरम्यान सर्व सुरक्षा उपाययोजना आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व त्याचबरोबर त्यांच्या या साहसी प्रवासासाठी सर्व टू-स्ट्रोक प्रेमीं तर्फे शुभेच्छा दिल्या.