Pune News | पितृपंधरवड्यात भाज्यांची मागणी वाढली ; किमतीत बदल, जाणून घ्या दरवाढ-घसरण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मार्केट यार्डात सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची मोठी आवक झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने आवक होत आहे. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. त्यामुळे नैवैद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी या फळभाज्यांसह फ्लॉवर, शेवगा, घेवडा, पावटा, मटारला मागणी वाढली आहे. आवक-जावक कायम असल्याने या फळभाज्यांचे भाव टिकून आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, गाजर आणि घेवड्याच्या भावात सुमारे दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे.
येथील बाजारात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश हिरवी मिरची 25 ते 30 टेम्पो, इंदौर येथून गाजर 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 225 क्रेट्स, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, गुजरात, कर्नाटक येथून भुईमूग 6 ते 7 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 15 ते 16 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 50 ते 55 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 550 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 10 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमूग शेंग 60 गोणी, मटार 600 ते 700 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.





