Pune News | पीएचडी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी प्रवेश प्रक्रियेसाठी पुढील फेरी सुरू झाली आहे. या फेरीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना १० सप्टेंबर अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील. प्रवेश प्रक्रियेत १०० गुण मुलाखतीसाठी राहणार आहे. अंतिम निकाल तयार करताना प्रवेश प्रक्रियेत परीक्षेच्या गुणांना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षेतील गुणांना ७० टक्के महत्त्व, तर मुलाखतीला ३० टक्के महत्त्व दिले आहे.
विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. संशोधन क्षेत्रात कारकीर्द करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची आहे. खुल्या प्रवर्गासाठी १००० रूपये, तर राखीव प्रवर्गासाठी ८०० रूपये शुल्क आहे. पेट परीक्षेचे सर्व तपशील, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि परीक्षा वेळापत्रक हे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





