Pune News – एआय समिट दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेवेळी तप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे डेक्कन येथील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. पीएम कॉम्प्रमाईज, हा मुद्दा घेऊन युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत आहे. शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यात सहप्रभारी शांभवी शुक्ला, सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले.पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून देशहिताला तिलांजली दिली आहे. संसदेत चर्चा न करता मुद्दे दडपले जात आहेत. त्यामुळे जनतेच्या हितासाठी कॉंग्रेस आंदोलन करत आहे. आंदोलन करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेणे हे लोकशाहीविरोधी आहे, असे प्रथमेश आबनावे यांनी स्पष्ट केले. एपस्टीन फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार देशहिताचे प्रश्न टाळत असून अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, एआय समिट दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले. कोणतीही स्पष्ट कारणे न देता त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोपही काँग्रेसने केला.