पथारी व्यावसायिकांसाठी आर्थिक साक्षरता आणि आरोग्य जागरूकता शिबीराचे आयोजन

पुणे ( Pune News )- तुळशीबाग येथे भारतीय जनता पार्टी पुणे शहर हॉकर्स आघाडीच्या वतीने पथारी व्यावसायिकांसाठी आर्थिक साक्षरता, कौटुंबिक अर्थ नियोजन, भविष्यातील निर्वाह निधी नियोजन आणि बचत नियोजन यावर मार्गदर्शन करणारे शिबीर आयोजित करण्यात आले.
पुणे शहराचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ, कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबीरामध्ये सीए विजयराव अलिमकर यांनी आर्थिक साक्षरता आणि कौटुंबिक अर्थ नियोजन यावर महत्त्वाचे मार्गदर्शन केले. विमा तज्ञ राहुल काळभोर यांनी भविष्यातील निर्वाह निधी नियोजनासंबंधी सखोल माहिती दिली, तर सोमनाथ भोसले यांनी केंद्र शासन, राज्य शासन, व पुणे महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या वैद्यकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
पथारी व्यावसायिक हे पुणे शहराच्या “लाईफलाईन” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक भविष्यासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरणार आहेत. आर्थिक साक्षरता, गुंतवणुकीच्या संधी, आणि आरोग्य जागरूकतेसाठी या प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आगामी काळात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी श्री. गजानन मंडळ चौक, तुळशीबाग येथे अशी शिबिरे नियमित आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधून अधिकाधिक पथारी व्यावसायिकांनी सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. ( Pune News )





