Pune News : बंद भिडे पुलाचा वाहतुकीवर ताण! खरेदीसाठी गर्दी होत असल्याने दिवाळीत पूल सुरू ठेवण्याची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता तसेच मध्यवर्ती भागातील व्यापारी पेठांमध्ये नागरिक येण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या शनिवारी, रविवारी त्याची चाहूल लागली होती. खरेदीसाठी आलेले नागरिक आपली वाहने नदीपात्रात पार्किंग करतात. मात्र, ही वाहने बाहेर काढण्यासाठी पुन्हा मध्यवर्ती भागातूनच त्यांना बाहेर पडावे लागते. शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी मध्यवर्ती पेठांमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दिवाळी खरेदी काळात मोठी गर्दी होते. या गर्दीचा वाहतुकीवर मोठा ताण पडतो. यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच सध्या भिडे पूल सुरू केल्यास वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, रविवार पेठ, मंडई परिसर, शुक्रवार पेठ तसेच आसपासच्या भागात उपनगर तसेच जिल्ह्यातून दिवाळीची कपडे, दागिने तसेच सणांसाठीच्या खरेदीसाठी नागरिक येतात. प्रामुख्याने शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी होते. खरेदीसाठी आलेले नागरिक नदीपात्रात असलेल्या भिडेपूलाच्या दोन्ही बाजूस वाहनांचे पार्किंग करतात. मात्र, भिडेपूल बंद असल्याने येताना तसेच जातानाही वाहने डेक्कनकडून न येता शहराच्या मध्यवर्ती भागातूनच नदीपात्राकडे येतात. अनेक वाहने मुख्य रस्त्यावरच पार्किंग केली जातात.
या वाहनांसोबतच पश्चिमेकडील उपनगरातून दररोजची वर्दळ असलेली वाहने भिडेपूल बंद असल्याने झेड ब्रिज अथवा अलका चौकातून मध्यवर्ती पेठांमध्ये येतात. अशा वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून खरेदीसाठी आलेले ग्राहक तसेच सर्वसामान्य पुणेकरांना तासंतास ताटकळत राहावे लागते. तसेच वाहतूक नियोजन करतानाही पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात ताण येतो.
त्यातच महापालिकेकडून शहरातील फटाके विक्रेत्यांना वर्तक उद्यानाच्या बाजूला नदीपात्रात स्टॉल उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही गर्दी होणार आहे. ही बाब लक्षात घेता, हा पूल गणेशोत्सवात ज्या प्रमाणे पंधरा दिवस सुरू करण्यात आला होता, त्याचप्रमाणे दिवाळीतही सुरू झाल्यास वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
दिवाळीनंतर मुदतवाढ द्यावी..
गणेशोत्सवानंतर मेट्रोला १० ऑक्टोबरपर्यंत पूल बंद ठेवण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी ही मुदत संपल्यानंतर पूल आता चालू करावा. त्यांना बाकी कामे पूर्ण करण्यासाठी दिवाळीनंतर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम करण्यासाठी मार्च महिन्यापासून हा पूल बंद ठेवला आहे. गणेशोत्सवापुर्वी हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कामाच्या संथ गतीमुळे त्याला विलंब होत असल्याचे पाहून आता दिवाळीनंतरच या कामास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी वाहतूक पोलीस तसेच मेट्रोकडे केली आहे.





