Pune News : पुढच्या १० वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलणार; विभागीय आयुक्तांनी दिला मोठा आदेश
Pune News : मिसिंग लिंक्स जोडण्यापासून ते ई-चलन वसुलीपर्यंत; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचे सर्व विभागांना नियोजनाचे आदेश.

Pune News – पुणे शहरातील वाहतूक नियोजन व नियंत्रणासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म तपशील लक्षात घेऊन पुढील १० वर्षांचे नियोजन करावे. मुख्य रस्त्यांवरील मिसिंग लिंक, बॉटलनेक काढणे, रस्ता रुंदीकरण, फुटपाथ व पायाभूत सुविधांसह संपूर्ण कॉरिडॉरच्या सुधारणा करण्यासाठी प्राथम्याने करावयाच्या येणाऱ्या कामांची यादी पुणे महानगरपालिकेने तयार करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दिल्या.
पुणे शहर वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, अतिरिक पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, वाहतूक नियमनासाठी राबविण्यात येणारे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा. पथारी विक्रेत्यांचे क्षेत्र निश्चित करावेत, कार्यक्षेत्रानुसार काम करणाऱ्या संस्थांची निवड करावी, कामांची यादी तयार करुन कृती आराखडा तयार करावा, असे हर्डीकर यांनी सांगितले.
बैठकीत शहरातील ९० मुख्य चौकांमध्ये रस्ता रुंदीकरण, फेरीवाल्यांना सार्वजनिक सुविधा जागांमध्ये जागा देणे, पथदिवे बसविणे, बिनधनी वाहनांकरिता जागेची उपलब्धता, तंत्रज्ञान आधारित वाहतूक नियोजन, प्रलंबित इ-चलन, वाहतूक सल्लागार नेमणे, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढविणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.





