Pune News | प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला लागणार चाप ; पुणे विद्यापीठाचा इंडियन सिक्युरिटी प्रेससोबत महत्त्वपूर्ण करार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बनावट प्रमाणपत्रांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि पदवी प्रमाणपत्रांची विश्वासार्हता जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने गुणपत्रक व प्रमाणपत्र छपाईसाठी लागणारी उच्च दर्जाची स्टेशनरी आता नाशिक येथील अतिसुरक्षित इंडियन सिक्युरिटी प्रेसकडून खरेदी करण्याचा करार केला आहे. यामुळे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये (सिक्युरिटी फिचर्स) आणखी वाढणार असून, ती अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण होणार आहेत.
जागतिक स्तरावर अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये भारतासह अनेक देशांचे पासपोर्ट, १० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंतचे मुद्रांक, लष्करी ओळखपत्रे आणि विविध संवेदनशील सरकारी कागदपत्रांची छपाई केली जाते. याच प्रेसची निवड करून विद्यापीठाने आपल्या प्रमाणपत्रांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.प्रमाणपत्रे पारदर्शक, गोपनीय, सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली होती.
त्यामध्ये कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. संदेश जाडकर, डॉ. विजय खरे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. संजय तांबट आणि डॉ. चारुशीला गायके यांचा समावेश होता. या समितीने इंडियन सिक्युरिटी प्रेसला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली.देशातील तीन प्रमुख प्रेसच्या प्रस्तावांचा विचार केल्यानंतर, इंडियन सिक्युरिटी प्रेसची सुरक्षा मानके, कागदाचा दर्जा, गोपनीयतेची हमी आणि एकूण विश्वासार्हता या निकषांवर त्यांची निवड करण्याचा अहवाल समितीने सादर केला. या महत्त्वपूर्ण निर्णयाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद आणि खरेदी समितीनेही तात्काळ मंजुरी दिली आहे.
“विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांसाठी इंडियन सिक्युरिटी प्रेसकडून स्टेशनरी खरेदी करावी, अशी मागणी मी दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केली होती. विद्यापीठाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे विद्यापीठाचे कोट्यवधी रुपये तर वाचतीलच; पण प्रमाणपत्रे अतिशय सुरक्षित झाल्याने विद्यापीठाच्या प्रतिष्ठेत मोठी भर पडेल.”
– सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य




