Pune News : प्रेमभंगाचा प्रतिशोध रक्तरंजित; संतापलेल्या तरुणाचा प्रेयसीवर थेट गोळीबार !

पुणे : प्रेमसंबंधात झिडकारल्याने एकाने प्रेयसीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना बाणेर भागातील कंपनीच्या आवारात शुक्रवारी घडली. नेम चुकल्याने तरुणी बचावली. तक्रारदार तरुणी ‘एमबीए’ अभ्यासक्रम करत आहे. ती बाणेर भागातील एका खासगी कंपनीत प्रशिक्षण घेत आहे.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारा तरुणी कंपनीत निघाली होती. त्या वेळी आरोपीने तिला इमारतीच्या आवारात अडविले. आरोपीने घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या ‘डिलिव्हरी बाॅय’सारखा वेश परिधान केला होता. तरुणीला अडविल्यानंतर त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्यानंतर तरुणी घाबरली. तिने आरडाओरडा केला. नेम चुकल्याने तरुणी बचावली. तरुणीचा आरडाओरडा ऐकल्यानंतर कंपनीतील कर्मचारी, सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली.
आरोपी दुचाकीवरुन पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली.





