Pune News : सण आणि सुट्टीच्या हंगामामुळे रक्ताची टंचाई ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरे घटली, रुग्णांचे हाल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सव, दसरा, दिवाळीमुळे सुट्ट्यांच्या दीर्घ कालावधीस सामोरे जावे लागल्याने शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी पुणेकरांनी रक्तदानात सक्रिय भाग घेण्याचे आवाहन जनकल्याण रक्तपेढीने केले आहे. सणासुदीच्या कालावधीतील सुट्ट्यांमुळे अनेकजण बाहेरगावी किंवा आपल्या मुळ गावी गेले आहेत. दिवाळी संपली असली तरी शाळा सुरू झाल्या नसल्याने सुट्ट्यांचा हंगाम संपलेला नाही.दरवर्षी मोठ्या सुट्टींच्या काळात रक्ताची टंचाई निर्माण होते.
सुट्टीमुळे रक्तदान शिबिरेही होत नाहीत. थॅलेसिमिया, कर्करोग आणि अन्य मोठ्या, गंभीर शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात अडचण येत आहे. याशिवाय बाळंतपण, अपघात या तातडीच्या प्रसंगी रक्त उपलब्ध होणे सध्या अवघड झाले आहे. रक्त उफलब्ध होण्यासाठी दाताच लागतो. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
जनकल्याण रक्तपेढीत दरमहा दोन हजार रक्तपिशव्या संकलित होतात. गेल्या महिन्यापर्यंत २९३ शिबिरे झाली. ते आणि रक्तपेढी संकलन मिळून १९ हजार ६४९ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये १३०० रक्त पिशव्यांचे संकलन झाले. जनकल्याण रक्तपेढीत रोज ८०-९० रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. याचप्रमाणे अन्य रक्तपेढ्यांनाही रक्ताची गरज असते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.
पुणे शहर आणि परिसरामध्ये सर्व प्रकारची ७८० रुग्णालये आहेत. त्यामध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाच्या रुग्णालयांच्या समावेश आहे. शहरात सरकारी, खासगी ३५ रक्तपेढ्या आहेत. शहरात उपचार घेण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातून रुग्ण येतात. त्यामुळे नेहमीच रक्ताची मागणी असते. शहरातील सर्व रुग्णालयांना दररोज सरासरी १५०० पिशव्यांची गरज भासते, प्रत्यक्षात मात्र, ७०० ते ८०० पिशव्यांचे संकलन होत आहे. उन्हाळा आणि दिवाळीच्या दिवसांत रक्तदान शिबिरांची संख्या घटते. त्यामुळे दर वर्षी उन्हाळा, दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.
का भासते टंचाई ?
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुण्यात रक्ताची कमतरता निर्माण होते. या कालावधीत महाविद्यालयांना सुट्टी असते. कंपन्यांमधील कर्मचारी गावाकडे किंवा पर्यटनासाठी पुण्याबाहेर गेलेले असतात. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते. या सर्वांचा फटका सध्या अत्यवस्थ रुग्णांना बसतो. दिवाळीच्या सुट्टीमुळे नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाणही जास्त असते.





