Pune News : भोई प्रतिष्ठानकडून गणेशोत्सवातील कर्तृत्ववानांचा कृतज्ञता सन्मान

पुणे : एखादे मंगल कार्य पार पाडण्यासाठी शेकडो हात अहोरात्र राबत असतात. मात्र कार्य पार पडल्यावर त्यांचा विसर पडतो. पण भारताची संस्कृती अशी आहे की, ज्या हातांनी कार्य पार पाडले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. ही संस्कृती जपण्याचे काम भोई प्रतिष्ठान गेली २१ वर्षे करीत असून ही समाधानाची गोष्ट आहे. पोलिसांच्या सोबत अशा संस्था असल्यानेच गणेशोत्सवासारखा मोठा उत्सव निर्विघ्न पार पडतो, असे प्रतिपादन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले.
गणेशोत्सवात अहोरात्र राबून गणेशभक्तांची सेवा करणाऱ्या पुणे अग्निशमन दल, जीव रक्षक, आपत्कालीन वैद्यकीय मदत पथकातील डॉक्टर्स व रुग्णवाहिका चालक, नागरी संरक्षण दल आदी संस्थांचा भोई प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता सन्मान करून गौरव करण्यात आला. या वेळी शर्मा म्हणाले, सोलापूरमध्ये झालेल्या डीजे-मुक्त गणेशोत्सवाचे अनुकरण पुणेकर पुढच्या वर्षी करतील, असा मला विश्वास आहे.
या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पोलीस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर, ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. के. भागवत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार राजीव सावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक व भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले की, गणेशोत्सवात पोलिसांच्या मदतीला अनेक संस्था व व्यक्ती धावून येतात. ते निरपेक्षपणे काम करतात आणि विस्मरणात जातात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम गेली एकवीस वर्षे राबवला जातो.
उमाकांत मिटकर यांनी या वेळी सांगितले की, पोलीस व नागरिक यातील दुवा म्हणून अशा संस्था कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. रुपाली चाकणकर यांनी महिलांचा वाढलेला सहभाग आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन घेत असलेल्या काळजीचे कौतुक केले. तर कृष्णकुमार गोयल यांनी सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यात अशा संस्थांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अग्निशमन दल, जीव रक्षक, आपत्कालीन वैद्यकीय मदत पथक, मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट, शेट ताराचंद रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, महापालिका कामगार युनियन सफाई सेवक, पोलीस बांधव, पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास, राष्ट्रीय कला अकादमी, नागरिक संरक्षण दल, महापालिका गणेशोत्सव समिती, शिल्पकार, चित्रकार, सजावटकार, सनई-चौघडा वादनकार, मंडप उभारणारे, ट्रॅक्टर व बैलगाडी चालक, समाधान पोलीस मित्र संघटना, रॉबिन हूड आर्मी आदींचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. यावेळी आशीष जराड यांनी सूत्रसंचालन केले.





