Pune News | विमानात शस्त्र घेऊन जाण्याचा प्रयत्न! ; पुणे विमानतळावर महिलेविरोधात गुन्हा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – लोहगाव विमानतळावर मंगळवारी (दि. २३) रात्री सुरक्षा तपासणीत एका महिलेच्या हँडबॅगमधून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली. तिच्याकडे शस्त्र परवाना नसल्याने विमानतळ पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.वैशाली वैभव दोशी (वय ४४, रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विमान कंपनीचे प्रतिनिधी जयेंद्र शिरोडकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही मंगळवारी रात्री पुणे विमानतळावरून इंदौरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी आली होती.
सिक्युरिटी लेव्हल-२ ए मशिनवरून सामानाची तपासणी सुरू असताना तिच्या हँडबॅगमध्ये पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळली. त्यामुळे विमानतळ सुरक्षा यंत्रणेत तात्काळ अलर्ट पसरला. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मोठे उल्लंघन मानले जात आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी दिली. विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.





