Pune News : लोहगावचे दोन प्रभागात विभाजनामुळे इच्छुकांचा भ्रमनिरास; राजकीय गणितही कोलमडले
– प्रतिनिधी / प्रकाश बिराजदार
विश्रांतवाडी : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहगाव परिसरातील इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. अनेकांनी सामाजिक कामांत सक्रिय राहून आपली उमेदवारी निश्चित मानली होती.काही इच्छूकांनी तर पदरमोड करून विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाने केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेनुसार लोहगावचे दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची हा यक्ष प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झाला आहे.
या अनपेक्षित बदलामुळे एकसंघ लोहगावची रचना बदलल्याने अनेक इच्छुकांचे राजकीय गणितच कोलमडले आहे. परिणामी, नगरसेवक होण्यासाठी ‘गुडघ्याला बाशिंग बांधून’ तयारीला लागलेल्या इच्छुकांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. स्थानिकांमध्येही या निर्णयाविषयी नाराजीचा सूर असून, अनेकांनी प्रभाग रचनेवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. काही इच्छुकांनी तर पक्षश्रेष्ठींना आपल्या नाराजीबाबत कळवले आहे. लोहगाव एकसंघ रहावे याकरिता प्रभाग रचनेवर हरकती देखील घेणार आहेत. मात्र हरकतींचा विचार होणार की “जैसे थे” प्रभाग राहणार हे अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यावरच समजेल.
लोहगावच्या निम्म्या भागाचा पालिकेच्या जून्या हद्दीत १९६२ साली समावेश करण्यात आला होता. त्यानंतर सन १९९७ मध्ये लोहगावच्या उर्वरित भागाचाही पालिकेत समावेश करण्यात आला. मात्र या भागाला त्यावेळी पालिका हद्दीतून वगळण्यात आले होते. तर २०१७ साली पालिकेत ११ गावांचा समावेश झाला.
त्यावेळी उर्वरीत लोहगावचा देखील पालिकेत समावेश झाला. त्यामुळे लोहगावमध्ये पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि विकासाचा अनुशेष दूर होईल, अशी येथील नागरिकांना आशा निर्माण झाली होती. समाविष्ट ११ गावांचा मिळून प्रभाग क्रमांक ४२ करण्यात आला. मात्र प्रभागाच्या विचित्र रचनेमुळे येथील नागरीक, राजकीय मंडळी व कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरले होते.
या भागात सक्रिय असलेले व पूर्वी पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती व लोहगाव ग्रामपंचायतच्या राजकारणात सक्रिय असलेले कार्यकर्ते पालिकेची निवडणूक लढवून शहराच्या राजकारणात सक्रिय राहण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत होते. यामध्ये नव्या व तरुण उमेदवारांचाही भरणा होता. प्रभाग ४२ च्या निवडणुकीत लोहगावातील कोणत्याही इच्छूकाला उमेदवारी मिळाली नाही. साहजिकच इतर भागातील निवडून आलेल्या नगरसेवकांनी लोहगावकडे लक्ष न दिल्याने विकास खुंटला.
त्यानंतर २०२२ साली महापालिकेची निवडणूक होणार या आशेने सर्व पक्षाच्या प्रमुख इच्छूकांनी सणावाराला सोशल मिडियातून शुभेच्छा देण्यापासून लग्न, समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमांना न चुकता हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. काही इच्छूकांनी तर पदरमोड करून विकासकामे देखील केली. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर गेली.
त्यामुळे इच्छूकांनी हात आखडता घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा पालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सर्वप्रथम प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.या रचनेत लोहगावची दोन तुकड्यात विभागणी झाली आहे. पदरमोड करत केलेल्या विकासकामांचा फायदा घेऊन निवडणुकीत उतरायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही प्रभागफोडी धक्कादायक ठरली आहे.





