Pune News: ‘खडकी शिक्षण संस्थेची प्रतिमा उंचाविण्यात माजी विद्यार्थ्यांचे कार्य उल्लेखनीय’ – कृष्णकुमार गोयल

पुणे – खडकी शिक्षण संस्थेची प्रतिमा उंचाविण्यात माजी विद्यार्थ्यांचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे. या संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सामाजिक ,राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या स्थापनेला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याने माणिक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, सचिव आनंद छाजेड, सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
चाळीस वर्ष सेवा केलेल्या सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. विशेष अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांची जडण घडण ज्या महाविद्यालयाने केली, ज्या वास्तूने संस्कार केले, आपले भवितव्य घडविले, समाजामध्ये सन्मानाचे स्थान दिले त्या महाविद्यालयाच्या विकासाकरिता माजी विद्यार्थ्यांनी नेहमी पुढाकार घेतला पाहिजे, असेही कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.
संस्थेची खरी ओळख ही माजी विद्यार्थ्यांवरून होत असते. हॉकी या खेळाला महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे, असे नमुद करत डॉ. अरुण अडसूळ यांनी महाविद्यालयामधून उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले.
प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याशी निगडित शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. आनंद छाजेड यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केले.
सूत्रसंचालन विजया चव्हाण यांनी केले. आभार शरद बोटेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील विजय लोंढे,रमेश लोंढे, दिशा वांबुरकर, कल्याण काळे, नितीन पैलवान यांनी विशेष परिश्रम घेतले.




