पुणे : भारताच्या आरोग्य क्षेत्रात वाढत्या कायदेशीर गुंतागुंतीच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, तसेच त्वरित, संवेदनशील आणि तज्ज्ञ-आधारित विवाद निराकरणाची गरज लक्षात घेता, पुण्यातील अग्रगण्य विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठाच्या विधी विभागाने कायदा व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना एका मंचावर आणत पर्यायी विवाद निराकरण (एडीआर) आणि आरोग्यक्षेत्र परिषद २०२५ चे आयोजन केले. या परिषदेमध्ये आरोग्य क्षेत्रातील विवादांमध्ये एडीआरचे वाढते महत्त्व आणि त्यातील संभाव्य बदल यावर चर्चा करण्यात आली. सदरील परिषद विद्यापीठाच्या सम्यक अर्थात मध्यस्थी व लवाद केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. मार्च २०२५ मध्ये स्थापन झालेले सम्यक हे मध्यस्थी व लवाद विषयातील कौशल्यविकास, शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एम. के. महाजन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड आणि ज्येष्ठ वकील ॲड. प्रताप परदेशी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. न्यायमूर्ती एम. के. महाजन म्हणाले, “न्यायाधीश म्हणून एडीआरविषयी जनजागृती निर्माण करणे ही माझी केवळ कायदेशीर नव्हे तर घटनात्मक जबाबदारी आहे. मध्यस्थी आणि लवादाच्या प्रक्रियेमध्ये तरुण वकिलांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे.” या परिषदेमध्ये डॉ. सुरेखा कश्यप, श्री. अनिरुद्ध राजूरकर, डॉ. प्रसाद ठाकुरदेसाई डॉ. उज्वला शिंदे आणि अॅड. अमन दत्ता यांचा परिसंवादात सहभाग होता. या चर्चेचे समन्वयन ॲड. तेजस हुळे यांनी केले. चर्चेमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा, रुग्ण तक्रारी, संस्थात्मक वाद, नियामक प्रश्न इत्यादी विषयांवर एडीआरचा उपयोग कसा होऊ शकतो यावर विचार विनिमय झाला. विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुकुंद कुलकर्णी यांनी संस्थात्मक दृष्टीकोन मांडताना सांगितले की, “सम्यकसारखी व्यासपीठे ‘मानवी क्षमतेचा जास्तीत जास्त विकास’ या आमच्या संस्थात्मक ध्येयाशी सुसंगत असून कायदे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” विधी विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अपूर्वा भिलारे यांनी कायद्याच्या शिक्षणातील बदलांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “एडीआर ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पॅनल सदस्यांनी मांडलेल्या विचारांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले आहे.” परिषदेचा समारोप करताना, सम्यक हे मध्यस्थी आणि लवाद केंद्र एक समग्र परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगत आहे. हा पुढाकार आरोग्य क्षेत्रासारख्या विशेष क्षेत्रांमध्ये न्यायप्रवेश सुलभ करण्यास आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देण्यास मदत करणार आहे.