Pune News : पुण्यात आकाश थोरात टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर हत्याराने हल्ला करून खून करणाऱ्या आणि आंबेगाव परिसरात दहशत माजवणाऱ्या आकाश थोरात टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी ही कारवाई केली.
टोळीप्रमुख आकाश भरत थोरात (वय ३२, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय २४), आदित्य जालिंदर शिंदे (वय १८), रोहित बाळासाहेब कचरे (वय २१), विशाल ऊर्फ गोड्या दीपक गणेचारी (वय २१) आणि सहा अल्पवयीन मुलांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यापैकी अजित धनावडे फरार आहे.
यश खंडु कांबळे (वय २३, रा. कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे मित्र आदित्य काकडे, साहिल काकडे आणि सार्थक ऊर्फ ओम नितीन पंडित (वय १९, रा. अटल चाळ, कात्रज) यांचा ग्रुप आहे. सुमारे एक वर्षापूर्वी आदित्य शिंदे याने काकडेंच्या पानटपरीवर भांडण केले, तेव्हा आदित्य आणि साहिल काकडे यांनी शिंदेला मारहाण केली होती. याच वैमनस्यातून ५ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता यश कांबळे आणि सार्थक पंडित दुचाकीवरून जात असताना आकाश थोरात टोळीने त्यांची दुचाकी अडवली.
“तुमच्या मित्रांनी आमच्या भावाला मारलं, आता तुम्हाला जीवंत सोडणार नाही,” असे म्हणत काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले, तर उपचारादरम्यान सार्थक पंडित याचा मृत्यू झाला. प्रथम खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल झाला होता, पण पंडित यांच्या मृत्यूनंतर खुनाचे कलम जोडण्यात आले.
आकाश थोरात टोळीवर २०१५ पासून १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीप्रमुखाने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या गुन्हेगारांचा वापर केला आहे. प्रतिबंधात्मक कारवाया असूनही त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे पाठवला. बनसोडे यांनी प्रस्तावाची छाननी करून कारवाईला मंजुरी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमुले, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, सहायक पोलीस फौजदार चंद्रकांत माने, पोलीस हवालदार ढमढेरे, पोलीस अंमलदार अजय सावंत आणि आबासाहेब खाडे यांनी केली.





