पुणे : ‘स्मार्ट’ पुण्यात पदपथ की पथारी पथ?

पुणे – शहरात येत्या शनिवारी (दि.11) पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शहरातील पदपथांची सद्य:स्थितीबाबत दै. “प्रभात’ने आढावा घेतला. या पाहणीत शहरातील काही भागांमध्ये पदपथांचा विस्तार करून ते सुशोभित केले आहेत. मात्र, असे असले तरी बहुतांश भागात पदपथांना अतिक्रमण, दुरवस्था, अस्वच्छता अशा विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत.
धार्मिक स्थळांच्या सजावटी, सुरक्षा भिंतीच्या अडचणी
शहरात अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांच्या सजावटी, सुरक्षा भिंती या पदपथाचा भाग व्यापतात. तर, त्या लगतच असलेले फुले, इतर साहित्य विक्रेत्यांमुळे पदपथावरून चालणे अधिक अडचणीचे ठरते. विशेषत: धार्मिक उत्सव कार्यक्रमांच्या वेळीदेखील दर्शनाच्या रांगा या पदपथावरच लागलेल्या असतात. अशा स्थितीत सर्व सामान्यांना याठिकाणाहून चालण्यास अडथळे निर्माण होतात.
बांधकाम साहित्य, राडारोड्याने व्यापले
शहरातील विविध भागांमध्ये मेट्रो, उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, जलवाहिन्या-सांडपाणी वाहिन्या टाकणे, विद्युत अथवा दूरसंचारच्या केबल, गॅस पाइपलाइन टाकणे यासारखी कामे सातत्याने सुरू असतात. अशा कामांसाठी आवश्यक असणारी साधने त्याचबरोबर रस्ता खोदल्यानंतर त्याचा राडारोडा हा अनेकदा पदपथावरच टाकला जातो. तो दिवसेंदिवस तसाच पडून राहतो. सद्य:स्थितीत सिंहगड रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता या भागांमध्ये पदपथावर राडारोडा टाकलेला दिसून येतो.
पदपथ ठरताहेत विक्रेत्यांसाठी अतिरिक्त जागा
शहरातील लक्ष्मी रस्ता, शिवाजीनगर, शनिवारवाडा, टिळक रस्ता, फर्गसन महाविद्यालय रस्ता अशा जवळपास सर्वच रस्त्यांवरील पदपथ हे तेथील खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू विक्रेत्यांचे दुकान, हातगाड्यांसाठी अतिरिक्त जागा ठरत आहे. पदपथावरच मांडून ठेवलेल्या वस्तू, त्याठिकाणी खुर्च्या टाकून खाद्यपदार्थांची केली जाणारी विक्री हे पादचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. परिणामी नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होतो.
पार्किंगने पदपथाला अडथळा
स्वारगेटपासून कात्रजकडे जाताना भापकर पेट्रोल पंपाच्या अलीकडे दुतर्फा असलेल्या गॅरेजमधील गाड्या पदपथावर उभ्या केल्या जातात. अनेक ठिकाणी दुकानदारांनी लोखंडी जाळ्या टाकून पथपद बंद केले आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी दुचारी, चारचाकी गाड्या या थेट पदपथावरच उभा केल्या जातात. पदपथाच्या शेजारी उभी केली जाणारी वाहनेदेखील पादचाऱ्यांसाठी अडचणीची ठरतात.
कचराकुंडी बनले पदपथ
अपघात, जाणूनबुजून केलेले नुकसान अशा विविध कारणांमुळे काही भागांमध्ये पदपथ तुटलेले आहेत. काही ठिकाणी पदपथाच्या मधोमध ड्रेनेज, विद्युत डीपी, सूचना फलक मधोमध उभारले आहेत. तर दिवसेंदिवस साचलेल्या कचऱ्यामुळे येणारी दुर्गंधी, पदपथाची घाण अवस्था यामुळेदेखील नागरिक पदपथ वापरण्यास टाळतात.





