Pune : पालखी मार्गाची लागली ‘वाट’

फुरसुंगी – हडपसर-सासवड मार्गावरील सत्यपूरम ते दिवेघाट दरम्यानच्या पालखी मार्गाची “वाट’ लागली आहे. सत्यपुरम, भेकराईनगर, पीएमपी स्थानक, पॉवर हाऊस, फुरसुंगी रेल्वे उड्डाणपूल, मंतरवाडी आदी परीसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण, अरुंद पूल, पुलाचे अधर्वट काम, रस्त्याच्या अर्धवट साइड पट्ट्या, रस्त्यालगत होणारे बेशिस्त पार्किंग आणि याकडे प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष यामुळे यावर्षीचा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याची वाट खडतरच असणार आहे.
करोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर संत ज्ञानेश्वर महारांजाचा पालखी सोहळा पायी वारी होत आहे. दि.21 जुनला पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळा प्रस्थानापूर्वी सोहळा समितीकडून संपुर्ण रस्त्याची पाहणी केली जाते. त्यामुळे हडपसर-सासवड पालखी मार्गावरील समस्या सदर समिती प्रशासनासमोर मांडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असला तरी गेली दहा वर्षे या पालखी महामार्गाची साधी डागडुजीही झालेली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या घोषणा राजकीय नेते मंडळी करतात. मात्र, प्रत्यक्षात काहीही काम होत नाही.
गेल्या दहा वर्षांपासून या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अनिश्चित काळासाठी बंद पडले आहे. यातून पालखी सोहळ्याची वाट बिकट झाली आहे.





