पुणे : ‘गाळ’न उचलणे ठेकेदारांना भोवणार

पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून शहरातील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या चेंबरची सफाईनंतर नालेसफाईचा गाळ चेंबरच्या जवळच रस्त्यावर न उचलता तसाच टाकण्यात येत असलेल्या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चेंबरच्या सफाईनंतर तातडीने गाळ उचलला जावा तसेच त्याची विल्हेवाट कुठे लावण्यात आली याची माहिती जीपीएस रेकॉर्डसह ठेकेदारांनी दिली तरच त्यांची बिले दिली जावीत तसेच या सफाईच्या कामाची तातडीने पाहणी करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह ड्रेनेज विभागास दिले आहे.
या चेंबरमधून काढलेला गाळ तातडीने उचलणे आवश्यक असतानादेखील तो चेंबरच्या बाजूलाच रचण्यात आला आहे. पाऊस पडताच पाण्यासोबत हा गाळ पुन्हा चेंबरमध्ये जाईल, याची पूर्ण खबरदारी ठेकेदारांकडून घेण्यात आली असल्याचे चित्र शहरभर पहायला मिळत आहे. हा प्रकार दैनिक “प्रभात’ने “चेंबर सफाईचा गाळ रस्त्यावरच’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणला होता.
काय म्हणाले अतिरिक्त आयुक्त
या प्रकाराबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार म्हणाले की, शहरात जवळपास 60 हजाराहून अधिक चेंबर असून त्यात प्रामुख्याने पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या चेंबरचा समावेश आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ते स्वच्छ केले जात आहे. या कामांच्या निविदा काढतानाच त्यात गाळ काढल्यानंतर तो तातडीने उचलावा तसेच त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे, स्वच्छता झाल्यानंतर तो तातडीने उचलणे आवश्यक आहे. याशिवाय, हे गाळ उचलतानाचे फोटो तसेच तो उचलून विल्हेवाट लावण्याच्या जागेपर्यंत वाहनांद्वारे घेऊन गेल्याचे जीपीएस रेकॉर्ड ठेकेदारांकडून घेतले जाणार आहे. त्यानंतरच त्यांना बिले दिली जाणार आहे. त्यासाठी तातडीने या कामाचा फेर आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.





