Pune News : तब्बल 49 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका

पुणे : शालेय शिक्षण विभागात एकाच कार्यालयात तीन वर्षाहुन अधिक कालावधी पुर्ण झालेल्या तब्बल ४९ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन त्यांच्यात खांदेपालट करण्यात आले आहे. यातून मक्तेदारीही मोडीत काढण्यात आलेली आहे.
शालेय शिक्षण विभागात एकाच कार्यालयात एकाच पदावर अनेक वर्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मक्तेदारीही वाढली. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी बदल्यांचे माध्यम वापरले जाते. त्यातच आता शिक्षण संचालकांच्या बदल्यासाठी शासनाला मुहुर्त लागला. नागरी सेवा मंडळाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यात शिक्षण संचालक ३, शिक्षण उपसंचालक ९, शिक्षणाधिकारी १६, उपशिक्षणाधिकारी ५, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ६, वरिष्ठ अधिव्याख्याता १० याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची प्राथमिक शिक्षण संचालकपदी बदली झाली आहे. योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपदी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची योजना शिक्षण संचालकपदी बदली झाली आहे.
बदली रद्द करण्यासाठी कुठल्याही स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदभारातून तात्काळ कार्यमुक्त करावे व बदली झालेले अधिकारी दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील, याची खातरजमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा लागणार आहे.
आता बालभारती अध्यक्ष, राज्य मंडळ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष ही पदे रिक्त पडलेली आहेत. या पदांचा अतिरिक्त कार्यभारही बदली झालेल्या शिक्षण संचालकांवरच सोपविण्यात येणार आहे. कोणत्या संचालकांकडे कोणता अतिरिक्त कार्यभार सोपविला जाणार याबाबत शिक्षण वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे.
शिक्षण उपसंचालकांना नव्या नियुक्त्या
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक – डॉ. गणपत मोरे,
योजना शिक्षण संचालनालय शिक्षण उपसंचालक – डॉ. वंदना वाहूळ,
अमरावती बोर्ड विभागीय सचिव – बी.बी.चव्हाण,
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक – आर. आर. कंकाळ,
विद्या प्राधिकरण शिक्षण उपसंचालक – दीपक चवणे,
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक – संजय कुमार राठोड,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उपायुक्त निशादेवी बंडगर,
अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक – निलिमा टाके,
नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक – डॉ. माधुरी सावरकर.





