Pune news : युवा अभियंते, वास्तुविशारदांसाठी ज्ञान आणि नेटवर्किंगचा नवा मंच; पुण्यात YOUCONS 3.0 चा शुभारंभ
युवा व्यावसायिकांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्यातच उद्योगासाठी सक्षम, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि व्यावसायिकदृष्ट्या जागरूक बनविणे हा YOUCONS उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Pune news : पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (PCERF) तर्फे युवा स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद, इंटिरिअर डिझायनर्स, विद्यार्थी तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या YOUCONS 3.0 या मंचाचे पुण्यातील PYC हिंदू जिमखाना येथे यशस्वीपणे उद्घाटन करण्यात आले.
युवा व्यावसायिकांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्यातच उद्योगासाठी सक्षम, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि व्यावसायिकदृष्ट्या जागरूक बनविणे हा YOUCONS उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या व्यासपीठाच्या माध्यमातून सेमिनार, वेबिनार, कार्यशाळा, तांत्रिक सत्रे, साइट व्हिजिट्स तसेच उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद अशा विविध उपक्रमांद्वारे ज्ञान, नेटवर्किंग, सहकार्य आणि उद्योगाशी प्रत्यक्ष संवादाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
YOUCONS 3.0 च्या विविध उपक्रमांसाठी भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. यांचे आर्थिक सहकार्य लाभत आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास इंजि. अथर्व राजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना युवा व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी YOUCONSच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच या उपक्रमाला भविष्यातही सहकार्य करण्याची आपली बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक इंजि. अजित भाटे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, प्रीकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि. यांच्या शुभहस्ते झाले. इंजि. मधुर डागा यांनी YOUCONS उपक्रमाची ओळख व त्यामागील दृष्टीकोन स्पष्ट केला, तर इंजि. नरेंद्र कोठारी, अध्यक्ष, PCERF यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना एर. अजित भाटे यांनी युवा व्यावसायिकांनी सातत्याने नवीन ज्ञान आत्मसात करून आपले कौशल्य विकसित करावे आणि बांधकाम क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप इंजि. हृषीकेश देशमुख यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या कार्यक्रमाला २०० हून अधिक बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, युवा व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
YOUCONS 3.0 च्या माध्यमातून PCERF युवा व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे सशक्त व परस्परांशी जोडलेले व्यासपीठ निर्माण करण्यासोबतच बांधकाम क्षेत्रासाठी पुढील पिढीतील कुशल, ज्ञानसंपन्न आणि उद्योगासाठी सज्ज व्यावसायिक घडविण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे.





