Pune news : पाच दिवसांत पुण्यात ९७ झाडपडीच्या घटना; अग्निशमन दलावर ताण
शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पुणे अग्निशमन दलाकडे झाडपडीच्या तब्बल ९७ वर्दी प्राप्त झाल्या असून, सर्व ठिकाणी तातडीने मदतकार्य करण्यात आले.

Pune news : शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांत पुणे अग्निशमन दलाकडे झाडपडीच्या तब्बल ९७ वर्दी प्राप्त झाल्या असून, सर्व ठिकाणी तातडीने मदतकार्य करण्यात आले.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, १ जुलै रोजी ९, २ जुलै रोजी ७, ३ जुलै रोजी २१, ४ जुलै रोजी ३१, तर ५ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत २९ झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत झाडे कोसळण्याच्या घटनांचा आकडा ९७ वर पोहोचला आहे.
मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि जमिनीची झालेली पाण्याने संतृप्त अवस्था यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. या घटनांमुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्यात मोठ्या व जुन्या झाडांखाली वाहन उभी करू नयेत किंवा अनावश्यक थांबू नये, तसेच झाड कोसळल्यास तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





