Pune news : ७ वर्षाचा संसार १५ दिवसात संपला…; परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर !

पुणे – वैचारिक मतभेदामुळे सव्वा तीनवर्षांपासून वेगळे राहणाऱ्या उच्च दांपत्याचा घटस्फोट अवघ्या १५ दिवसात कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. कदम यांनी मंजुर केला आहे. त्यामुळे ७ वर्षांपूर्वी झालेला विवाह संपुष्टात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सव्वा तीन वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ॲड. विजय आगरवाल यांच्यामार्फत परस्मर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. ॲड. आगरवाल यांना ॲड. श्वेता बराथे आणि ॲड. नयन गिल्डा यांनी मदत केली. दोघांचा विवाह नोव्हेंबर २०१८ रोजी झाला.
सुरूवातीला काही काळ सुरळीत संसार केला. त्यानंतर पटेनासे झाले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे मार्च २०२२ पासून वेगळे राहू लागले. दोघेही उच्चशिक्षित आहेत. नोकरी करतात. आता एकत्र येणे शक्य नव्हते. त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने मंजुर केला. निकालानुसार दोघांना अपत्य नाही. त्याने तिला स्त्रीधन आणि ५ लाख रुपये दिले आहेत.
दोघेही सव्वा तीन वर्षांपासून वेगळे राहत होते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
– ॲड. विजय आगरवाल, दांपत्याचे वकील





